धुळे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दुकानदारास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : दुकानावर भगर घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दुकानदारास पाच वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सत्र न्यायधीश वा.य. जी देशमुख यांनी ठोठावली आहे. साक्री तालुक्यातील उंबरे येथे 26 सप्टेंबर 2017 रोजी ही घटना घडली होती. पिडीतेची आजी हिने सकाळी दहा वाजेच्या सुमारास पीडीतेला दुकानावरून भगर आणण्यासाठी पाठवले.

यावेळी दुकानावर कोणीही नसल्याने तिच्या घराच्या जवळ राहणाऱ्या मुकुंदा प्रभाकर जगदाळे याने तिला हात धरून दुकानाच्या आतल्या खोलीत घेऊन गेल्यानंतर तिचा विनयभंग केला. घडल्या प्रकाराची माहिती पीडितेने तिच्या आजीला दिल्यानंतर तिच्या आजीने साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार जगदाळे याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. जी. पाटील यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यावेळी सरकारी वकील अजय सानप यांनी फिर्यादी तसेच पिडीता व घटनास्थळाचे पंच आणि इतर महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयाच्या समोर सादर केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील गणेश पाटील यांनी युक्तिवाद केला. यात त्यांनी हा गुन्हा समाजावर परिणाम करणारा असून साक्ष आणि पुरावे पाहता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची विनंती त्यांनी केली.  आरोपी आणि फिर्यादी पक्षाची साक्ष आणि पुरावे पाहता सत्र न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी जगदाळे यास बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअन्वये पाच वर्षे सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हेही वाचलंत का?

The post धुळे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दुकानदारास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा appeared first on पुढारी.