धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी व गारपीटीचा सामना करावा लागत आहे. मागील 15 दिवसांपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी-वारा व काही भागात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीची जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. जिल्ह्यातील सुमारे 8 हजार 717 शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 75 लाख 98 हजार एवढा निधी दि. 10 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयान्वये मंजुरही केला आहे. बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे मदतीचे वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे. या महिन्यातही गारपीट, वादळामुळे शेतपिकांचे, घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला व प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयाला दक्षतेचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल तिथे तहसिल, कृषि कार्यालयाचा प्रतिनिधी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधेल, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

The post धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन appeared first on पुढारी.