धुळे : अवैध गोवंश वाहतुक रोखली, ट्रकचालकावर गुन्हा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

सामोडे चौफुली ते भारत पेट्रोलपंप दरम्यान एका ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहितीनुसार पिंपळनेर पोलीसांनी सामोडे चौफुलीवर सापळा रचला असता ट्रकचालकासह गोवंशास जीवदान मिळाले आहे.

गस्तीवर असलेल्या पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी पथकासह गुरुवार (दि.23) पहाटे सव्वाचारच्या सुमारास सामोडे चौफुलीवर सापळा रचला. त्याप्रमाणे ट्रक (जीजे. ०९/ वाय ९८६७) हा त्या ठिकाणी आला असताना वाहनचालकास थांबण्याचा इशारा पोलीसांनी केला. मात्र वाहनचालकाने भरधाव वाहन पुढे नेत रस्त्याच्या कडेला लावले व तेथून अंधाराचा फायदा पळ काढजा. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता यामध्ये ४० हजार रूपये किंमतीच्या तीन गायी व १ लाख ५३ हजार रूपये किमतीचे १३ गो-हे दाटीवाटीने कोंबलेल्या परिस्थितीत आढळून आले. या कारवाईत ७ लाख ८० हजार रूपये किमतीच्या ट्रकसह १ लाख ९३ हजारांची असे एकूण ९ लाख ७९ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्सटेबल प्रणय सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस नाईक प्रकाश मालचे हे पुढील तपास करीत आहेत.

The post धुळे : अवैध गोवंश वाहतुक रोखली, ट्रकचालकावर गुन्हा appeared first on पुढारी.