धुळे : अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन

धुळे: पुढारी वृत्तसेवा : धुळे येथे आजपासून (दि.२१) सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाला (Ahirani Sahitya Sammelan)  सुरूवात झाली. या संमेलनात आहिराणी सारस्वतांचा कुंभमेळा भरला असून, या संमेलनाला खानदेशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी हजेरी लावली आहे. आज गांधी पुतळ्यापासून दिंडीला प्रारंभ झाला. या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले. विशेषत: खानदेशी वाद्याच्या तालावर आमदार कुणाल पाटील यांच्यासह साहित्यिकांनी देखील फेर धरला.

माजी मंत्री रोहिदास पाटील, लताताई रोहिदास पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आणि संमेलन अध्यक्ष रमेश बोरसे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. त्यानंतर अहिराणी दिंडीच्या पालखीची धुरा आमदार कुणाल पाटील यांनी खांद्यावर घेत दिंडी मार्गस्थ केली.

आ. कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने धुळ्यात सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन (Ahirani Sahitya Sammelan)  आज सुरू झाले. दोन दिवस चालणारे अहिराणी साहित्य संमेलन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी,  हिरे भवन येथे संपन्न होत आहे. आज अहिराणीच्या पालखीचे व ग्रंथाचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. दिंडीमध्ये खान्देशाची विविध संस्कृती दाखवणाऱ्या सण,  उत्सवांचे सजीव देखावे सादर करण्यात आले होते. त्यामुळे धुळे शहरांमध्ये आज संपूर्ण खान्देश संस्कृती अवतरल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. दिंडी गांधी पुतळा, फुलवाला चौक, कराचीवाला खुंट, जमनालाल बजाज रोड मार्गे बारा फत्तर चौकाकडून हिरे भवनात खान्देशी वाजंत्री वाजत गाजत पोहोचली.

दिंडीत घडले अवघ्या खान्देशाचे दर्शन

गांधी पुतळ्यापासून निघालेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये कानबाई, गौराई, भुलाबाई, डांख्या वाद्य, आदिवासी नृत्य, पोतराज,गोंधळी, व्हलर वाजा,लग्नाचे देवत, भजनी मंडळ असे खान्देशातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे वैविध्यपूर्ण सजीव देखावे सादर करण्यात आले होते. कानबाईचे गाणे, आदिवासी नृत्य, अहिराणी गाणे यामुळे वातावरण भारावून निघाले होते.

Ahirani Sahitya Sammelan : आमदार कुणाल पाटील यांनी धरला ठेका

दिंडीमध्ये खानदेशी वाजंत्री, आदिवासी वाद्य तसेच वल्हर वाजंत्रीवर आमदार कुणाल पाटील यांच्यासह साहित्यिकांनी ठेका धरला. त्यामुळे आमदार कुणाल पाटील हे अहिराणीच्या या उत्सवात एकरूप झाल्याचे दिसून आले. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी तसेच साहित्यिकांनीही ठेका धरल्यामुळे दिंडीमध्ये रंगत वाढली.

सातासमुद्रापार आहिराणीचा डंका

खानदेश आणि अहिराणी भाषेचा डंका सातासमुद्रपार गाजत असल्याचे या संमेलनाच्या वैशिष्ट्यातून दिसून आले. इटली या देशाच्या खान्देश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक अलीचे डेफ्लोरियान यांची उपस्थिती लाभली. त्या खान्देशातील बोली भाषा, आहिराणी, साहित्य, संस्कृतीचा त्या अभ्यास करीत आहेत. आज सकाळी निघालेल्या साहित्य दिंडीतही त्यांनीही खान्देशी नृत्यावर ठेका धरला तर उद्घाटन समारंभालाही त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्या अहिराणी भाषेचा डंका सातासमुद्रापार वाजल्याचा अभिमान उपस्थित खानदेश वासियांना झाला.

साहित्य संमेलनाचे उद्घाटक साहित्यिक आणि लेखक डॉ. उत्तम कांबळे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना सांगितले की, अहिराणी संमेलन हे साहित्याचेच नाही. तर संस्कृतीचे सुद्धा आहे, कारण अहिराणी भाषा प्राचीन संस्कृती, तत्त्वज्ञान शिकवित असते. भाषा ही जगण्याची रीत झाली पाहिजे, अहिराणी साहित्य स्वतंत्र असावे, नवीन साहित्याची निर्मिती अहिराणीमध्ये झाली पाहिजे. आपण ओरिजनल आहोत, कधीही अनुवाद करू नका आपल्या संस्कृतीवर, खाद्यावर, देवावर, निसर्गावर साहित्य लिहा.

आमदार कुणाल पाटील म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला अहिराणीचा वेलू गगनावर घेऊन जायचा आहे. अहिराणी जतन करण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. त्यामुळे अहिराणीच्या या उत्सवात मनापासून सहभागी होऊन सर्वांनी अहिराणी भाषेसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी केले.

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुभाष अहिरे म्हणाले की, घराघरात अहिराणी भाषा बोलली गेली पाहिजे तरच अहिराणी भाषेचे संवर्धन होईल. गेल्या चार अहिराणी संमेलनांना आधार देण्याचे काम दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी केले आहे, म्हणून आज अहिराणी साहित्याचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रात फडकत असल्याचेही सुभाष अहिरे यांनी सांगितले.

अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश बोरसे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,  इतर साहित्य संमेलनांना शासनाची आर्थिक मदत असते, परंतु अहिराणी साहित्य संमेलन हे साहित्यिकच भरवत असतात त्यामुळे खऱ्या अर्थाने ती अभिमानाची बाब आहे. धुळ्याची भूमी साहित्यिक, क्रांतिकारकांची, समाजसेवकांची भूमी आहे. त्यामुळे खानदेशात निर्माण होणारे साहित्य हे अभिमानास्पद आहे. अहिराणीमध्ये दर्जेदार साहित्य निर्माण होण्याची गरज असल्याचीही अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. अहिराणी भाषा ही आपली आई आहे, तरीही आज आपल्याला अहिराणी बोलण्याची लाज वाटते, अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.  मी अखेरच्या श्वासापर्यंत अहिराणीसाठी काम करणार असल्याचे ही रमेश बोरसे यांनी सांगितले.

Ahirani Sahitya Sammelan  : साता समुद्रापार पोहोचली अहिराणी

अहिराणी संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून इटली येथील अलीचे डिप्लोरियान या खान्देश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अहिराणीतून करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी राम राम मंडई! मजा मा शेत का सगळा? मी इटलीनीशे, पण तुम्हना अहिराणीवर प्रेम करस असे सांगून त्यांनी अहिराणी भाषेतच परिचय करून दिला. यावेळी त्यांनी सांगितले की, अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे अहिराणी साहित्याचे लिखाण वाढले पाहिजे व अहिराणीचे महत्त्व वाढवण्यासाठीही प्रयत्न केले गेले पाहिजेत.

यावेळी माजी अध्यक्ष सुभाष अहिरे, माजी आमदार शरद पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेनाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, डॉ. सुशील महाजन, साहित्यिक कृष्णा पाटील, जगदीश देवपूरकर, नृत्य दिग्दर्शक संतोष संकद, साहित्यिक रमेश सूर्यवंशी, रत्नाताई पाटील, विश्राम बिरारी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, डॉ. दरबारसिंग गिरासे, साहेबराव खैरनार, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :  

The post धुळे : अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन appeared first on पुढारी.