धुळे: ‘आप’चा मंगळवारी शेतकरी मेळावा; शासनाकडे विविध मागण्या करणार

धुळे: पुढारी वृत्तसेवा: शहरात आम आदमी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ सप्टेंबररोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास पक्षाचे निरीक्षक दीपक सिंगला, राज्याचे निवडणूक प्रभारी महादेव नाईक, राज्याचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष रंगाजी राजुरे, तसेच सरपंच भास्कर पेरेपाटील उपस्थित राहून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य संघटक बाबासाहेब चव्हाण व प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना ७५ हजार हेक्टरी भरपाई मिळावी, अल्पभूधारक शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. शासनाने त्यांना नांगरणीपासून ते पेरणी, कापणी, खतांसाठी रब्बी व खरीप हंगामासाठी आर्थिक मदत करावी. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करून वाढीव कर्ज पुरवठा करावा. अल्पभूधारक शेतकर्‍यांना घरकुल योजनेतून घरे मंजूर करावीत. आत्महत्याग्रस्त, अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना दोन लाखांऐवजी पाच लाखांची आर्थिक मदत करावी. अल्पभूधारक शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम ६ हजारांवरून वार्षिक १५ हजार करावी.

केरळ सरकारप्रमाणे महाराष्ट्रात फळे भाजीपाला कांदा व नाशवंत पिकास हमीभाव ठरवून द्यावा. दिवसा विद्युत पुरवठा सुरू करावा. सौर ऊर्जेवर चालणारे सोलरपंप बसवून द्यावेत. शेतकर्‍यांच्या मुलांची फी माफ करून अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या मुलांना सर्व शिक्षण मोफत देण्यासाठी कायदा करावा. शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना कृषीपूरक उद्योगासाठी कर्ज द्यावे. अथवा सुशिक्षित बेरोजगार मुलांना जोपर्यंत त्यांच्या हाताला काम मिळत नाही, तोपर्यंत राज्य शासनाने प्रतिमहिना ३ हजार रूपये द्यावेत आदी मागण्या या मेळाव्यातून शासनाकडे करण्यात येणार असल्याचेही बाबासाहेब चव्हाण व बिपीन पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे: ‘आप’चा मंगळवारी शेतकरी मेळावा; शासनाकडे विविध मागण्या करणार appeared first on पुढारी.