धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

धुळे, पुढारी वृत्तसेवा : चीन, जपान, कोरिया व अमेरिका या देशांमध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली. कोविड अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कंचन वानेरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. शेख, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त के. एस. देशमुख, सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 शर्मा यांनी जिल्हातील आरोग्य सेवा-सुविधांचा आढावा घेऊन लसीकरणाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात मागील कोविड लाटेचा आढावा घेऊन सध्या उपलब्ध असलेले ऑक्सीजन प्लाँट, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटीलेटर, कॉन्सेट्रेटर, उपचारासाठी उपलबध बेडसची संख्या, लसीकरणाची मात्रा, मास्क, टेस्टींग किटस् आदी बाबींचाही आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या दृष्टीने पूर्वतयारी केली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यात वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण, मास्क यासाठी अधिक सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे यांनी तर लसीकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी दिली.

हेही वाचंलत का?

The post धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.