धुळे: गाडी अडवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एकाला अटक

Crime Rate

धुळे; पुढारी वृत्तसेवा : वाहन अडवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या टोळीतील एकाच्या मुसक्या आवळल्या असून उर्वरित गुन्हेगारांना शोधण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

धुळे तालुक्यातील हेंकळवाडी येथे राहणारे समाधान ब्रिजलाल पाटील हे (एमएच ४६ बी बी 96 70) या गाडीने नवलनगर कडून नंदाळे गावाकडे जात होते. त्यांची गाडी अंबोडे गावाजवळ डोंगराजवळ आली असता चार अज्ञात तरुणांनी कार आडवी लावून त्यांना थांबवले. यानंतर मारहाण करून त्यांच्याकडील रोकड, सोन्याची चैन आणि अन्य वस्तू असा ऐवज चोरून पसार झाले.

या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतरपणे सुरू केला. या रस्त्यावर चोरी करणाऱ्या रमजान मेहमूद पठाण, विजय रामकृष्ण गायकवाड, वसीम हुसेन शेख उर्फ वसीम बाटला, सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल तसेच मनोज शंकर पारेराव यांच्या टोळीची माहिती पोलिसांना मिळाली. यातील रमजान पठाण याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा करण्यासाठी मनोज पारेराव यांनी स्विफ्ट कार उपलब्ध करून दिल्याची तसेच फिर्यादी समाधान पाटील हा नंदाळे गावाकडे जात असल्याची माहिती पुरवल्याची बाब प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आता उर्वरित गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पथकाला सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा 

The post धुळे: गाडी अडवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एकाला अटक appeared first on पुढारी.