धुळे : गोवर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी- जिल्हाधिकारी

गोवर लसीकरण,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या काही भागात गोवर आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचा प्रभाव प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय कृती दलाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले.

गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासह लसीकरणाच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. एस. वानखेडे, धुळे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. शेख, जिल्हा बालसंगोपन अधिकारी डॉ. सचिन बोडके आदी उपस्थित होते.

सांगली : ‘जत विस्तारित योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा दिशाभूल करणारी’

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, मुलांमध्ये लसीकरण मोहीम राबवावी. त्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. आवश्यक तेथे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. पाच वर्षापर्यतच्या कार्यक्षेत्रातील बालकांचे सर्वेक्षण करून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची लसीकरण सत्रनिहाय यादी अद्यावत करावी. त्यात प्रामुख्याने गोवरवरील लसीकरणाचा समावेश करून घ्यावा. त्यानुसार आरोग्य विभागाने ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रात मोहीम राबवावी. सत्रनिहाय यादी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्या मार्फत अद्ययावत करावी. ‘गोवर’ बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास त्या भागात तातडीने सर्वेक्षण मोहीम राबवीत लसीकरणावर भर द्यावा. प्रत्येक पात्र बालकाला गोवरसह अन्य लसीकरणाचे डोस द्यावेत. त्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी. तसेच पुढील लसीकरणाचा डोस नियमितपणे घेतला जाईल याचीही दक्षता घ्यावी.

लसीकरण सत्रांचे तातडीने नियोजन करून अंमलबजावणी करावी. प्रत्येक अधिकच्या लसीकरण सत्राचे तालुक्यातील तसेच जिल्हास्तरावरुन व महानगरपालिका स्तरावरुन दैनदिनी स्वरुपात आढावा घेतला जाईल. लसीकरणासाठी कुपोषित बालकांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्व बालकांसोबत कुपोषित बालकांना प्राधान्याने लस मिळेल याची दक्षता घ्यावी. जीवनसत्व ‘अ’ पूरक मात्रा आवश्यकतेनुसार देण्याचे नियोजन करावे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी सांगितले, गोवर लसीकरणाबाबत लसीकरण सत्रात जे लाभार्थी ६ महिन्यांपासून जीवनसत्व व मात्रांपासून वंचित आहेत. त्यांना जीवनसत्व अ देण्याचे नियोजन करण्यात आले. उद्रेक भागात घरोघरी सर्वेक्षण करून डोस द्यावेत. अतिरिक्त गोवर रुबेला लस मात्रा देण्यात येत आहेत. त्याचबरोबर गोवरचा प्रादुर्भाव असलेल्या भागात आवश्यकतेनुसार नऊ महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना गोवर रुबेलाचा एक अतिरिक्त डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांनी गोवर प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

हेही वाचा :

The post धुळे : गोवर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी- जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.