धुळे : गोविंदाेत्सवात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच

दहीहंडी

धुळे: पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात दहीहंडीचा सण पारंपरिक उत्साहात आणि शांततेत साजरा होण्यासाठी रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्याच्या शोध पथकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सोशल मीडियावरून जिल्ह्यात शांततेचे वातावरण बिघडवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यात 60 ठिकाणी गोविंदाेत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यापैकी 14 मोठे मंडळे असून, 41 लहान मंडळांनी या उत्सवासाठी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. विशेषत: धुळे जिल्ह्यामध्ये एकही प्रशिक्षित गोविंदापथक नसल्याने संबंधित पोलिस ठाण्याच्या शोधपथकांनाच त्यांच्या हद्दीतील दहीहंडी साजरी करणाऱ्या ठिकाणांना भेटी देऊन या ठिकाणांवरील धोकादायक परिस्थितीचे पूर्वीच अवलोकन करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच दहीहंडी बांधण्यात आलेल्या ठिकाणच्या विजेच्या तारा त्याचप्रमाणे साउंड सिस्टिम आणि विद्युत रोषणाई यातून कोणालाही अपाय होणार नाही यासाठी आधीच पाहणी करण्यात येणार आहे. या संदर्भात संबंधित मंडळांनादेखील सूचना देण्यात आल्या असून, मंडळांना काळजी घेण्याचे सुचविण्यात आले आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर तसेच सोशल मीडियावरून चुकीचे मेसेज पाठवून वातावरण खराब करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात 600 होमगार्ड आणि राज्य राखीव दलाची एका कंपनीसह दंगा नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डीजेचा वापर बेकायदेशीर असून, यासंदर्भात कोणी तक्रार केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारादेखील यावेळी पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिला आहे. गोविंदा मंडळांनी कुणालाही त्रास न होता हा उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post धुळे : गोविंदाेत्सवात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच appeared first on पुढारी.