धुळे : घरफोडी करणारा चोरटा २४ तासात जेरबंद

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे शहरातील आझाद नगर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अवघ्या २४ तासात मुद्देमालासह गजाआड करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकाने केली.

धुळ्यातील आझादनगर परिसरात वसीम अफसर मिर्झा यांच्या निवासस्थानी घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या प्रकरणात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

खबऱ्याच्या माध्यमातून ही चोरी जुनेद अब्दुल हमीद खाटीक या कबीरगंज मधील चोरट्याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने खाटीक याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून २५ हजार रुपयांची रोकड आढळून आली. त्याने या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.

या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी न्यायालयात या आरोपीकडून उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने ही पोलीस कोठडी दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे : घरफोडी करणारा चोरटा २४ तासात जेरबंद appeared first on पुढारी.