धुळे जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी शिंदे आणि भाजपा गटात चुरस

निवडणूक,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा नियोजन समितीच्या 23 जागांपैकी 22 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. संक्रमित क्षेत्राच्या एका जागेसाठी राज्याच्या सत्तेत सोबत असणारे शिंदे आणि भाजपच्या गटात या जागेसाठी चुरस होणार आहे. दरम्यान नियोजन समितीच्या या 22 जागांमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे.

धुळ्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या 23 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यासाठी 32 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. दरम्यान माघारी नंतर 23 पैकी 22 जागा बिनविरोध निवडून आल्याचे चित्र स्पष्ट झाले. यात लहान नागरिक क्षेत्र, मोठे नागरिक क्षेत्राच्या जागेसाठी प्रत्येकी एकच अर्ज शिल्लक असल्याने या जागा बिनविरोध झाल्या. मात्र संक्रमित क्षेत्रातील एका जागेसाठी दोन उमेदवार असल्याने त्यासाठी 21 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान लहान ग्रामीण नागरिक क्षेत्रातून महिलांच्या जागांवर ज्योती बोरसे, शालिनी पाटील, सुमित्रा गांगुर्डे आणि अभिलाषा पाटील, जनाबाई पावरा, धरती देवरे, सुदामती गांगुर्डे हे बिनविरोध झाले आहेत. पुरुषांच्या गटामधून हर्षवर्धन दहीते, राघवेंद्र पाटील, महावीर रावल, संजय पाटील, देवेंद्र पाटील, ललित वारुडे, आनंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अनुसूचित जातीच्या एका जागेतून सुधीर सुधाकर जाधव हे देखील बिनविरोध झाले आहेत. मोठ्या क्षेत्रातील सात जागांसाठी देखील सातच अर्ज शिल्लक राहिल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहे. त्यात सर्वसाधारण गटातून हर्षकुमार रेलन, देवेंद्र सोनार, महिला गटातून सुरेखा उगले, भारती माळी तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातून सुनील सोनार आणि प्रतिभा चौधरी या बिनविरोध झाल्या आहे.

यापूर्वीच मोठ्या नागरिक क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या जागेवर सुशिलाताई ईशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान आता संक्रमित क्षेत्राच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या जागेसाठी शिंदखेडाचे अनिल वानखेडे आणि साक्रीचे सुमित नागरे हे रिंगणात आहेत. साक्रीचे नागरे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचे असून शिंदखेडाचे वानखेडे हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळे आता या एका जागेसाठी शिंदे आणि भाजपा या दोन्ही गटात चुरस होणार आहे. साक्रीचे सतरा तर शिंदखेडाचे 18 अशा 35 मतदारांवर या दोघांचे भविष्य ठरवणार आहेत.

हेही वाचा :

The post धुळे जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी शिंदे आणि भाजपा गटात चुरस appeared first on पुढारी.