धुळे जिल्हा परिषद : सभापती पदावर भाजपाचे चौघे सदस्य बिनविरोध

बाजार समिती निवडणूक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड मंगळवारी (दि.18) पार पडली. यामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती पदावर भाजपाच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. यात कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन दहीते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी संजीवनी सिसोदे, समाज कल्याण समितीच्या सभापती पदावर कैलास पावरा तर शिक्षण आरोग्य समितीच्या सभापती पदावर महावीरसिंह रावळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीसाठी उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. त्यासाठी शिंदखेडा तालुक्यातून दोन आणि शिरपूर तसेच साक्री तालुक्यातून एका सदस्याला सभापतीपद देण्याचा निर्णय झाला. मात्र या पदांवर कोणाला संधी मिळते. याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती. अखेर मंगळवारी (दि.18) त्यावर पडदा पडला. यात कृषी आणि पशुसंवर्धन सभापती पदासाठी साक्री तालुक्यातील निजामपूर गटातील सदस्य हर्षवर्धन दहिते ,महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गटाच्या सदस्य संजीवनीताई सिसोदे ,समाज कल्याण समितीच्या सभापती पदासाठी शिरपूर तालुक्यातील रोहिणी गटाचे सदस्य कैलास पावरा तसेच शिक्षण आणि आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी साक्री तालुक्यातील मालपुर गटाचे महावीरसिंह रावल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध होऊ नये. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने देखील उमेदवार देण्यात आले. त्यासाठी बेटावद गटाचे ललित वारुडे ,दुसाने गटाचे पोपटराव सोनवणे, धीरज अहिरे, देऊर बुद्रुक गटाच्या जिजाबाई पारधी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र जिल्हा परिषदेत 56 पैकी 36 सदस्य भाजपाचे असून दोन सदस्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आहेत. या सदस्यांचा भारतीय जनता पार्टीला मदत होते आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सभापती निवडले जाणार असल्याची स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी उमेदवारी मागे घेतली. परिणामी भारतीय जनता पार्टीचे चौघेही सभापती बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार यांच्यासह अनेकांनी नवनियुक्त सभापतींचा सत्कार करत अभिनंदन केले.

हेही वाचा:

The post धुळे जिल्हा परिषद : सभापती पदावर भाजपाचे चौघे सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.