धुळे जिल्ह्यात एक कोटींच्या गांजा-अफुच्या साठ्याची पर्यावरण पूरक पद्धतीने विल्हेवाट

गांजा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ३२ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा तसेच अफूचा साठा धुळे जिल्हा पोलीसांनी आज पर्यावरण पूरक पद्धतीने नष्ट केला आहे. हा साठा १ कोटी १५ लाख ३० हजार ९६६ रुपये किमतीचा असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान यापुढे देखील अमली पदार्थ विरोधात धुळे जिल्हा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आज दिली आहे.

धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कारवाया करण्यात आल्या. या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल हा न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर तसेच तज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मध्यवर्ती साठागृहात ठेवला जातो. या साठागृहात गोळा झालेल्या अमली पदार्थांच्या मुद्देमाला संदर्भात निर्णय घेण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटीची स्थापना केली जाते. या कमिटीच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घेऊन अमली पदार्थ नष्ट करण्याबाबतचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले होते.

या निर्देशानुसार सोमवारी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय स्थापन असलेल्या कमिटीतील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक रवींद्र बनतोडे ,यांच्यासह कॉन्स्टेबल संदीप सरग, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ ,नितीन मोहने , सोनवणे, राहुल गिरी, सागर शिर्के आदी उपस्थित होते.

या जिल्हास्तरीय समितीच्या उपस्थितीत रासायनिक विश्लेषकांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्यातील दहा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला एकूण ३२ गुन्ह्यातील हा अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये एकूण १०८५ किलो गांजा तसेच ८९२ किलो गांजाची झाडे आणि २३२ किलो अफूची बोंडे तसेच दहा किलो वजनाच्या गांजाची बियाणे असा एक कोटी १५ लाख ३० हजार ९६६ किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून पर्यावरण पद्धतीने नष्ट करण्यात आला.

यापुढे देखील अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. अशा तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अमली पदार्थाची लागवड किंवा तस्करी करण्याची माहिती देणारेचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस नियंत्रण कक्ष तसेच संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात यावी, असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.

हेही वाचा

The post धुळे जिल्ह्यात एक कोटींच्या गांजा-अफुच्या साठ्याची पर्यावरण पूरक पद्धतीने विल्हेवाट appeared first on पुढारी.