धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड 

गुन्हे अन्वेशन विभाग www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

दहशत तयार करण्या साठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने धुळे तालुक्यातील सोनगीर शिवारातून रंगेहात पकडले आहे. दरम्यान जानेवारी महिन्यापासून धुळे जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणाऱ्या 27 गुन्हे दाखल झाले असून यात 39 कट्टे व 62 काडतूस देखील जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली. शिरपूर येथील शरदचंद्र नगरात राहणारा हरिओम संजय सिंह या युवकाकडे गावठी कट्टा असून तो शिरपूर सह परिसरात दहशत तयार करण्यासाठी या हत्याराचा वापर करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी हरिओम संजय सिंह याच्यावर पाळत ठेवली. तो सोनगीर गावाजवळील वालखेडा फाट्यावर उभा असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे ,संदीप सरग ,योगेश चव्हाण, मयूर पाटील, कमलेश सूर्यवंशी, तुषार पारधी ,राहुल गिरी ,कैलास महाजन यांनी वालखेडा फाट्यावर सापळा लावला. यावेळी शिताफीने हरिओम संजय सिंह याला ताब्यात घेतले असता त्याने कमरेच्या मागील बाजूस गावठी कट्टा ठेवल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्यांनी हा कट्टा कुणाकडून घेतला याची माहिती पोलीस पथक घेत असून कट्टा बाळगण्याचे कारण देखील तपासले जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिले आहे. जानेवारी महिन्यापासून या जिल्ह्यात अशा प्रकारचे शस्त्र बाळगणारे 27 गुन्हे दाखल झाले असून त्यात 39 कट्टे तर 62 काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती देखील बारकुंड यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा:

The post धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड  appeared first on पुढारी.