धुळे : तपकीर देण्यास उशीर झाल्याने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीची हत्या

Husband murdered his wife

धुळे : पुढारी वृत्तसेवा

तपकीर दिली नसल्याच्या किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील नटवाडे गावात घडली आहे .या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील परधान देवी येथे राहणारे मुळसिंग आबा पावरा यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी गीताबाई पावरा हिचा विवाह रामलाल हजारे पावरा यांच्याशी झाला होता. रामलाल यांनी गीताबाई यांच्याकडून तपकीरची मागणी केली. मात्र कामात असल्यामुळे तपकीर देण्यास उशीर झाल्यामुळे रामलाल यांना राग आला. या संतापात त्यांनी गीताबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत गिताबाई यांना शिरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान ही माहिती गीताबाई यांच्या माहेरच्या नातेवाईकांना मिळाल्याने रुग्णालयात या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मयत महिलेच्या सासरची मंडळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका या नातेवाईकांनी घेतल्यामुळे तणावाचे वातावरण तयार झाले. मात्र पोलिसांनी समजूत घालून यावर मार्ग काढला. दरम्यान गीताबाई पावरा ही तिचे पती रामलाल पावरा यांच्यासोबत रक्षा बंधनासाठी माहेरी परधानदेवी येथे आली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुचाकीने पुन्हा नटवाडी गावी गेली. याच गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या संदर्भात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post धुळे : तपकीर देण्यास उशीर झाल्याने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीची हत्या appeared first on पुढारी.