धुळे : तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे साक्री तालुक्यात यशस्वी उत्पादन

तुर्कस्थान बाजरी,www.pudhari.news

अंबादास बेनुस्कर, धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील चिकसे शिवारात पिंपळनेर येथील शेतकरी निसार शेख यांनी तुर्कस्थानातून बाजरीचे बियाणे आयात करून शेतात पेरणी केली. त्यांनी या ‘तुर्की ‘ बाजरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. बाजरीचे पीक १२ फूट उंच आहे. शिवाय त्याला लागलेले कणीस तब्बल चार फूट लांबीचे आहे. भाकरी करण्यासाठी ही बाजरी चांगली असून तिला चव देखील छान असल्याचे शेख यांनी सांगितले. तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे उत्पादन घेण्याचा हा जिल्ह्यात बहुदा पहिलाच प्रयोग आहे.

पिंपळनेर येथील शेतकरी निसार शेख यांची चिकसे शिवारात शेती आहे. यावर्षी शेख यांनी शेतात बाजरीचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे बाजरी पेरणीसाठी शेख यांनी चक्क तुर्कस्थान या देशातून बियाणे मागवले. यासाठी प्रतिकिलो हजार रुपये खर्च त्यांना बियाण्यासाठी आला. शेख यांनी शेतात तुर्की बाजरीची पेरणी केली. शिवाय बाजरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. याविषयी शेख म्हणाले, बाजरी पेरताना प्रति एकर सव्वा किलो बियाणे पेरणीसाठी लागले. साधारण बाजरी प्रमाणेच इतर मशागतीची कामे व खते या बाजरीच्या पिकास द्यावी लागतात. तुर्की बाजरीचे उत्पादन प्रति एकर ६० क्विंटल पर्यंत येते प्रथमच तुर्की बाजरीची पेरणी जिल्ह्यात होत असल्याने यापूर्वी अशा वाणाची पेरणीचा अनुभव नव्हता. पिकाची जोपासना करताना काही चुकाझाल्या आहेत. मात्र पेरणी दाट झाली आहे. याचा परिणाम बाजरीचे उत्पादन थोडे घटण्याचा अंदाज आहे.

बाजरीची चव …

या बाजरीची चव गावठी बाजरी प्रमाणेच असते. शिवाय ती आरोग्यवर्धकही असल्याचेही म्हटले जाते. बाजरीच्या या वाणास टपोरे दाणे आहेत. स्थानिक बाजारपेठ जिथे उपलब्ध आहे, तिथे ही बाजरी विक्री करता येऊ शकते. चिकसेसह पंचक्रोशीत हा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याने परिसरातील शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. बाजरीच्या पिकाची चांगली वाढ झाली आहे. १२ फूट उंचीचे झाड आहे. त्यावर दोन ते चार फूट लांबीचे कणीस लागले आहे.

अतिवृष्टीचा बसला फटका…

निसार शेख यांनी यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर एक एकर क्षेत्रात तुर्कस्थानातून आलेल्या बाजरीच्या वाणाची पेरणी केली. पुढील हंगामात क्षेत्र वाढवून चार ते पाच एकरात पेरणी करणार आहेत. झाड उंच असल्याने वादळी वाऱ्यात काही झाडांचे नुकसान झाले. अतिवृष्टीचा फटका देखील काही प्रमाणात बसला आहे. यामुळे कणसाची अपेक्षीत वाढ दिसून येत नाही. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post धुळे : तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे साक्री तालुक्यात यशस्वी उत्पादन appeared first on पुढारी.