धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी

पिंपळनेरे पोलिस ठाणे,www.pudhari.news

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर शहरात घरफोडी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही टोळी दिवसा बंद घराची रेकी करुन रात्री त्या ठिकाणी घरफोडी करत होते, तशी कबुलीच ताब्यातील आरोपींनी दिली आहे. दरम्यान, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वीच एन्जॉयमेंटसाठी चोरी करणार्‍या तरुणांसह विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला होता. त्यात आता घरफोडी करणार्‍या तरुणांच्या टोळीला जेरबंद करुन कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.

पिंपळनेर शहरातील राजेसंभाजी नगर येथे राहणारे जयेश दिलीप देवरे यांच्या घरी दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी घरफोडी झाली होती. याबाबत त्यांनी पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हाही दाखल झाला होता. तसेच बालाजी नगरात राहणारे एलआयसी एजंट संदीप गुलाबराव शिंदे याच्याकडेही दि. 22 नोव्हेंबर 2022 रोजी घरफोडी झाली होती. त्यांनीही पोलिसांत धाव घेत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंदवला होता.

घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तपास पथके नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पिंपळनेर पोलिसांनी पथक नेमले होते. या पथकाकडून रात्रीला पेट्रोलिंगही सुरु करण्यात आली. या घरफोडीच्या घटनांचा तपास सुरु असतानाच पिंपळनेर पालिसांना गुप्त माहिती मिळाली की, नितीन उर्फ राजूभाई काळू पवार रा. घोड्यामाळ इंदिरानगर, पिंपळनेर, विक्की उर्फ विवेक अविनाश बच्छाव (19) रा.इंदिरानगर, पिंपळनेर, प्रथम उर्फ नानू अनिल नगरकर (18) रा.नानाचौक पिंपळनेर यांच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी सदर घरफोडी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विक्की उर्फ विवेक अविनाश बच्छाव व इतर संशयितांना ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांनी कबुली देताना सांगितले की, आमचा मुख्य साथीदार नितीन उर्फ राजूभाई काळू पवार रा. पिंपळनेर हा असून तो दिवसभरात कॉलनी परिसरात फिरुन बंद घराची रेकी करायचा व तो सांगेल त्याप्रमाणे आम्ही सोबत राहुन चोरी करत होतो. तसेच वरील दोन्ही घरफोड्या आम्हीच केल्याची कबुलीही त्यांनी दिली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून घरफोडीतील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच मोबाईलसह 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मुख्य आरोपी फरार!

घरफोडी करणारा मुख्य आरोपी नितीन उर्फ राजू काळू पवार रा.पिंपळनेर हा फरार असून प्रथम उर्फ नानू अनिल नगरकर (18), विक्की उर्फ विवेक अविनाश बच्छाव  (19) यांच्यासह दोन विधीसंघर्षीत बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या विधीसंघर्षीत बालकांना धुळे येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तरुणांची चौकशी सुरु असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

यांनी केली कारवाई

कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे,  अशोक पवार, कांतिलाल अहिरे,  प्रकाश मालचे, विजय पाटील, हेमंत पाटोळे, प्रदीप ठाकरे, पंकज वाघ, दावल सैंदाणे, नरेंद्र परदेशी, रविंद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

…तर 112 संपर्क साधा!

घरफोडी करणारे आरोपी हे बंद घरावर पाळत ठेवत असतात. तसेच रात्रीच्या वेळेला कुलूप कडीकोयंडा तोडून घरफोडी करतात. त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जातांना तसेच घराच्या मागील व पुढील लाईट रात्रीच्या वेळेला सुरु ठेवावेत, तसेच सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम घरात न ठेवता बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. आपल्या परिसरात कोणीही संशयीत व्यक्ती दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात अथवा डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी केले आहे.

हेही वाचा : 

The post धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी appeared first on पुढारी.