धुळे : देवदर्शनासाठी पायी निघालेल्या दोघा भाविकांवर काळाचा घाला, ट्रकने चिरडल्याने मृत्यू

accident

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात असलेल्या श्री. रोकडोबा हनुमान मंदिरावर दर्शनासाठी पायी जाणाऱ्या दोन भाविकांना एका ट्रकने चिरडल्याची घटना आज घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकाला महामार्ग सुरक्षा पथकाने मालेगाव येथे ताब्यात घेतले आहे.

धुळे शहरातील गल्ली क्रमांक सहा मध्ये नवभारत चौकात राहणारे राजू विश्वनाथ वाघारे (वय 50) आणि मनमाड जिमन मधील रहिवासी किशोर मधुकर थोरात (वय 47) ही दोघेही हनुमान भक्त असून ते श्रावण मासामध्ये धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात असलेल्या रोकडोबा हनुमान मंदिरात पायी दर्शनासाठी जात होते. नेहमीप्रमाणे आज देखील ते या मंदिरात दर्शनासाठी जात असताना धुळ्याकडून मालेगाव कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने त्यांना पाठीमागून धडक देऊन चिरडले. हा अपघात अवधान शिवारातील वासवा टायर जवळ घडला. हा अपघात केल्यानंतर ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक मालेगावच्या दिशेने पळवत नेला.  दरम्यान अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने राजू वाघारे आणि किशोर थोरात या दोघांना टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच राजू वाघारे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवलेल्या किशोर थोरात यांचा देखील मृत्यू झाला.

दरम्यान या अपघाताची माहिती पोलीस पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने महामार्ग पथकाला ही माहिती कळवली. त्यानुसार मालेगाव शिवारात महामार्ग पथकाने एम पी 09 ए एच 93 61 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post धुळे : देवदर्शनासाठी पायी निघालेल्या दोघा भाविकांवर काळाचा घाला, ट्रकने चिरडल्याने मृत्यू appeared first on पुढारी.