धुळे : दोघा ट्रक चोरट्यांना दोंडाईचा पोलिसांकडून बेड्या

ट्रक चोरी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

गुजरात राज्यातून ट्रकची चोरी करून त्याची विल्हेवाट करण्यासाठी धुळे शहराकडे ट्रक नेणाऱ्या दोघांना दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. या ट्रक चोरी प्रकरणात सुरत येथे गुन्हा दाखल असल्याने या दोघाही चोरट्यांना सुरत गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे धुळे शहर हे चोरीच्या ट्रक विल्हेवाट करण्याचे केंद्र असल्याची बाब अधोरेखित होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

गुजरात राज्यातील सोनगड येथून रवींद्र सूर्यवंशी यांच्या घरासमोरून जी जे 26 ती 54 50 या क्रमांकाची ट्रक चोरीस गेली. हा ट्रक नवापूर मार्गे नंदुरबार येथून धुळे शहराच्या दिशेने जात असल्याची माहिती सुरत येथील गुन्हे शाखेचे निरीक्षक शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना ही माहिती सांगितली. यानंतर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दोंडाईचा शहरातून जाणाऱ्या सर्व मार्गांवर ग्रस्त वाढवून नंदुरबार चौफुली या ठिकाणी नाकाबंदी लावली. या नाकाबंदीच्या ठिकाणी कॉन्स्टेबल उमेश चव्हाण राजेंद्र सोनवणे यांनी नंदुरबारच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक ट्रकची तपासणी सुरू केली. यावेळी त्यांना सौरभ मंगल कार्यालयाजवळ एक ट्रक संशयीतपणे उभा दिसला. त्यांनी चालकाची चौकशी सुरू केली असता चालकाने हा ट्रक खराब झाला असून त्याची दुरुस्ती करीत असल्याचे उत्तर दिले. मात्र त्याच्या उत्तरात विसंगती आढळल्याने पोलीस पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता धुळे शहरातील समीर रफिक शाह तसेच मलिक अब्दुल शहा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांची छायाचित्र सुरत गुन्हे शाखेचे शिरसाठ यांना पाठवले असता त्यांनी या दोघांनीच ट्रक चोरी केली असल्याची बाब स्पष्ट केली. त्यामुळे या दोघेही चोरट्यांना सुरत येथील गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वीच धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ट्रक चोरीचे रॅकेट उघड केले. या प्रकरणात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह ट्रकला चेसीजचे बनावट नंबर ठोकणारे गुन्हेगार तसेच खोटे कागदपत्र तयार करणाऱ्या यंत्रणेची चौकशी सुरू असून या कारवाईमुळे ट्रक चोरीच्या रॅकेटचे कंबरडे मोडले होते. परिवहन विभागातील निष्काळजी पणाची देखील धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात चौकशी अद्यापही सुरू आहे. मात्र आता सुरत येथील ट्रक धुळे येथेच आणली जात असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याने धुळ्यातील ट्रक चोर आणखी सक्रिय झाले असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा :

The post धुळे : दोघा ट्रक चोरट्यांना दोंडाईचा पोलिसांकडून बेड्या appeared first on पुढारी.