धुळे : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई

धुळे : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई

धुळे, पुढारी वृत्तसेवा : मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवून स्वच्छता अभियान राबवण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात गोंधळ घालणे चांगलेच महागात पडले आहे. या पदाधिकाऱ्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.

धुळे जिल्ह्यात येत्या ९ ऑक्टोबर रोजी महंमद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवावी तसेच मद्य विक्रीचे दुकाने बंद करावे, या मागणीचे निवेदन घेऊन एमआयएमचे काही पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यासाठी पदाधिकारी जात असताना त्यांना दालनात केवळ पाच जणांना सोडले जाईल असे सांगितले. त्यामुळे एमआयएमचे पदाधिकारी भडकले.

निवेदन देण्यासाठी सर्वांना सारखा कायदा ठेवावा, अशी हरकत या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात गोंधळ सुरू केला.  उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या समवेत एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी हुज्जत घालणे सुरू केले. त्यामुळे दालनामध्ये गोंधळाची वातावरण तयार झाले. परिणामी गायकवाड हे दालनाच्या बाहेर गेले. या वेळी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या खुर्चीलाच निवेदन चिकटवून ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान ही माहिती धुळे शहर पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी गोंधळ घालणारे एमआयएमचे पदाधिकारी रफीक शाह यांच्यासह अन्य चौघांना ताब्यात घेतले.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना रफीक शहा यांनी सांगितले की, आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो. परंतु उपजिल्हाधिकारी गायकवाड हे निवेदन न स्वीकारताच दालनाच्या बाहेर गेले. त्यामुळे आम्ही खुर्चीला निवेदन चिटकवले. मात्र, यानंतर दालनात आलेल्या उपजिल्हाधिकारी यांनी आमच्याशी वाद घालून गैरवर्तन केल्याचा आरोप शहा यांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

The post धुळे : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई appeared first on पुढारी.