धुळे : निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवणार- संपर्कप्रमुख बबन थोरात

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठला आहे. आता शिवसैनिक गद्दारांसह साथ देणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केले.

शिंदखेडा शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बबनराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलतांना थोरात म्हणाले की, सत्ता व मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी गद्दारांनी उध्दव ठाकरे यांना विविध मार्गांनी त्रास दिला. शिवसेनेचे चिन्ह गोठावण्यापर्यंत यांची मजल गेली. यामुळे सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक पेटुन उठला आहे. तो आता स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या गद्दारांबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आता जास्तीत जास्त घरा-घरात जावून शिवसेना सदस्य नोंदणी करावी. एका गावात किमान दहा नवीन लोक जोडावी. प्रत्येक घरातील सदस्याला शिवसेनेचे विचार पटवून द्यावे. शिवसैनिकाने आता संघर्ष करायला तयार रहावे, असेही थोरात म्हणाले.

सध्याचा काळ हा संकटाचा काळ असून सगळीकडे गलिच्छ राजकारण सुरु आहे. या वातावरणातही उद्धव ठाकरे हे संयमाने वागत आहे. शिवसैनिकाने आता गावागावात जाऊन संघटनेची बांधणी करावी. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करा. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात जनताच शिवसेनेला न्याय देईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा समन्वयक डॉ. भरत राजपुत, युवासेनेचे आकाश कोळी, उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपुत, उपजिल्हासंघटक कल्याण बागल, विधानसभा संघटक गणेश परदेशी, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीश देसले, शिरपुर तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी जि.प.सदस्य छोटु पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सर्जेराव पाटील, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, तालुका समनव्यक विनायक पवार, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, शहरप्रमुख संतोष देसले, माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवणार- संपर्कप्रमुख बबन थोरात appeared first on पुढारी.