धुळे न्यायालयाचा आदेश, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

न्यायालय

धुळे : पुढारी वृत्तसेवा

नागपूर सुरत महामार्गाच्या विस्तारीकरणात गेलेल्या शेत जमिनीचा मोबदला विद्यमान शेतमालकाच्या नावावर वर्ग न करता शेतजमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग करण्यात आल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने धुळ्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात संबंधित शेतकरी, मध्यस्थ सह राज्य मार्ग व सडक परिवहन मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातून जाणाऱ्या नागपूर सुरत महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले. तत्पूर्वी धुळे शहरातील जमनालाल बजाज रोडवर राहणाऱ्या विमला दिलीप जैन यांनी धुळे तालुक्यातील मुकटी शिवारातही शेतजमीन खरेदी केली. यानंतर ही शेत जमीन राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात भूसंपादित करण्यात आली. मात्र या शेतजमिनीचा मोबदला हा जैन यांच्या खात्यात न येता त्यांना शेत जमीन विक्री करणाऱ्या यांच्या खात्यात गेल्यामुळे त्यांनी या प्रकरणात सडक परिवहन मंत्रालय, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. जैन यांनी या प्रकरणात विद्यमान मालक असल्याचे पुरावे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे सादर केले. मात्र त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार धुळे तालुका पोलीस ठाण्यात सुदाम बुधा पाटील ,हाजी फरीदशहा हाजी रमजान शहा, तसेच राज्य मार्ग व सडक परिवहन मंत्रालय, महाराष्ट्र सरकार , जिल्हाधिकारी कार्यालय, गणेश मिसाळ तसेच समक्ष जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्या विरोधात भादवी कलम 109, 119 ,120 ,120 ब ,167 ,182 ,196, 197, 198 ,199 ,200 ,210 ,217 ,218, 219, 406, 418 ,419, 420 ,426, 465 ,468 ,471, 474 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post धुळे न्यायालयाचा आदेश, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.