धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांचे पशुधन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या सहा जणांना राजस्थान मधून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. या टोळीने धुळे जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी केल्याची बाब उघडकीस आली असून राजस्थान राज्यात देखील त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, थाळनेर, धुळे तालुका आणि दोंडाईचा पोलीस ठाणे अंतर्गत मेंढपाळ यांच्या मेंढ्या चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या चोरीच्या घटनांमुळे वाडी वस्त्यावर तसेच शेतांमध्ये वस्ती करून राहणाऱ्या मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी हातात घेतला. यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, कॉन्स्टेबल संदीप सरग, प्रकाश सोनार, कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, पंकज खैरमोडे आदींचे पथक तयार करण्यात आले. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना हा गुन्हा राजस्थान राज्यात राहणाऱ्या चोरट्यांनी केल्याची बाब उघडकीस आली. यात राजू बंजारा याचा सहभाग असून तो राजस्थान राज्यातील कोटा येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याला या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी केली असता त्याने राजकुमार बलराम बंजारा, महेंद्र चुनीलाल बंजारा, श्यामलाल परतीलाल बंजारा, पृथ्वीलाल हरिलाल बंजारा यांच्या मदतीने या मेंढ्यांची चोरी केल्याची बाब उघडकीस आली.

त्याचप्रमाणे या मेंढ्या मध्यप्रदेशातील व्यापारी संतोष राजाराम बडगुजर याला विक्री केल्याची बाब देखील तपासात पुढे आल्याने बडगुजर याला देखील पथकाने ताब्यात घेतले. या मेंढ्या इनोव्हा कारमध्ये कोंबून त्यांची चोरी केल्याची बाब तपासात पुढे आल्याने आरजे 17 यु ए 2001 क्रमांकाची इनोव्हा देखील जप्त करण्यात आली आहे. विशेषत: या टोळक्यातील चौघांवर राजस्थान राज्यातील चार पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे.

The post धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.