धुळे : प्रत्येक पोलीस कर्मचारी हा अधिकारी बनूनच सेवानिवृत्त होणार – अप्पर पोलीस महासंचालक

पोलीस www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पोलीस दलातून अधिकारी बनूनच सेवानिवृत्त होण्याचे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. यासाठी शासनआदेश जारी झाला आहे.  यापुढे राज्यातील प्रत्येक पोलीस कर्मचारी हा पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त होईल, यासाठीचे नियोजन केले जात असल्याची माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांनी गुरुवारी, दि.20 धुळे येथे दिली.

शहरातील बाजार समितीत नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वर्मा यांनी पत्रकारांसमवेत संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी, तसेच ईश्वर कातकाडे व प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक जयसिंग तथा रावसाहेब गिरासे, उपप्रशासक भाऊसाहेब देसले यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील आणि अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वर्मा यांनी सांगितले की, आजच्या जनता दरबारामध्ये आलेले मुद्दे स्थानिक विषयांशी संबंधित असून  राज्यस्तरावर पोलीस कर्मचाऱ्यांसंदर्भात नियोजन सुरू आहे. राज्य शासनाने पोलीस नाईकपद काढून आता दहा वर्ष हवलदार असणाऱ्या कर्मचाऱ्याला बढती दिली जाणार आहे. त्यानंतर दर दहा वर्षांनी तो सहाय्यक उपनिरीक्षक आणि उपनिरीक्षक पदापर्यंत त्यास बढती दिली जाणार आहे. यासाठीचे नियोजन सुरू असून शासनआदेश देखील काढण्यात आला आहे. आता राज्यातील प्रत्येक कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त होईल या दृष्टीने नियोजन आहे. यासाठी सर्व जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

108 च्या माध्यमातून ॲम्बुलन्सची सुविधेवर जोडले जाणार असल्याचे देखील वर्मा यांनी सांगितले. राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न देखील मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्य सरकार प्रामुख्याने जागरूक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय प्रामुख्याने घेतला आहे. त्यासाठी नियोजन सुरू असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरासाठी अनुदानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे आयोजित करावी, अशा सूचनाही दिल्या असून त्यावर देखील अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोर्टलव्दारे तक्रारीची दखल….

राज्याच्या पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यावर विशेष भर दिला जातो आहे. पोलीस ठाण्यांमधील स्टेशन डायरी बाद होऊन सीसीटीएनएस तसेच 112 ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. आता 112 यंत्रणेमध्ये आणखी सुधारणा केली जाणार आहे. यासाठी सोशल मीडिया हँडलिंगसाठी सिटीजन पोर्टल तयार होईल. त्यात फेसबुक, ट्विटर सुरू होणार असून या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाणार आहे.

हेही वाचा:

The post धुळे : प्रत्येक पोलीस कर्मचारी हा अधिकारी बनूनच सेवानिवृत्त होणार - अप्पर पोलीस महासंचालक appeared first on पुढारी.