धुळे : बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून जल्लोष

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील आनंद्याचा पाडा, गरताड मुक्कामी बससेवा धुळे येथून सुरू करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

धुळ्यापर्यंत सुरू करण्यात आलेली मुक्कामाची बस जिल्हयाच्या शेवटच्या टोकावरील गावापर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण असून, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, प्रांत कार्यालय, अनु. जमाती जात पडताळणी कार्यालय धुळे शहरात आहे. या ठिकाणी बारापाडा, चौपाळे परिसरातील नागरिकांना महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जावे लागते. त्यातच हनुमंतपाडा हे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील गाव आहे. त्यामुळे कामे वेळेवर व सायंकाळी रात्र होण्याच्या आधीच घरी पोहोचणे शक्य होत नाही. या कारणांमुळे धुळे आगारातून आनंद्याचा पाडा, गरताडपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेची सोय होणार असून, गरताडपासून पुढे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमंतपाडा गावापर्यंत ही बस नेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. बससेवा सुरू होण्यासाठी माजी सरपंच गोपाळ शंकर ठाकरे यांनी पाठपुरावा केला. यावेळी आगारप्रमुख महाजन, घोडमोडे यांचे सहकार्य लाभले. संजय भोये, टिकाराम साबळे, गो. पा. सोनवणे, शिवाजी ठाकरे, महालू सूर्यवंशी, बाबुलाल पवार, चा. पा. सोनवणे, हिरामण गावित, राजू बागूल, मोतीलाल कोकणी, चुनीलाल सूर्यवंशी, जगदीश ठाकरे, धोंडू पवार आदी उपस्थित होते.

असे आहे वेळापत्रक….

धुळे आगारातून बस दुपारी ३ वाजता सुटणार आहे. साक्री दहिवेल, झिरणीपाडा, आनंद्याचा पाडा या मार्गे गरताड़ येथे सायंकाळी ६.३० वाजता बस पोहोचेल. गरताड येथे बस मुक्कामी असणार आहे. गरताड़ येथून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४५ वाजता ही बस धुळ्याकडे रवाना होईल. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ही बस धुळ्यात पोहोचणार आहे.

हेही वाचा:

The post धुळे : बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून जल्लोष appeared first on पुढारी.