Site icon

धुळे : बेहेडच्या कृषी केंद्रावर छापा ; बनावट खते जप्त, विक्रेत्यासह कंपनीवर गुन्हा दाखल

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा

बेकायदेशीर खतांचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या बेहेड येथील एका कृषी केंद्र संचालकाला कृषी विभागाने दणका दिला आहे. कृषी विभागाच्या कारवाईत खतांचा द्रव्य रुपातील साठा जप्त करण्यात आला असून विक्रेत्यासह संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यापार्श्वभूमीवर शेतक-यांकडून विविध खतांच्या ग्रेडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशावेळी अधिकृत खत विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना अनधिकृत व विना परवाना बनावट द्रवरूप खते कमी दरात उपलब्ध करून दिली जातात. यामुळे सध्या कृषी विभाग अलर्टवर आहे. साक्री तालुक्यातील बेहेड येथील धनदाई अँग्रो एजन्सीबद्दल संशय बळावल्याने काल दुपारी कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा विभागीय गुणवत्ता निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी पथकासह तिथे छापा टाकला. तेव्हा त्याठिकाणी मे.अँंग्रो मित्रा न्युट्रीकेम प्रा.लि.सातपुर, नाशिक यांनी उत्पादीत केलेले द्रव्यरूप ६० लीटर खते मिळून आलीत. याप्रकरणी बोगस खते विक्री केल्यावरून कृषी केंद्राचे संचालक विनोद तोरवणे यांच्यासह मे. अँग्रो मित्रा न्युट्रीकेम प्रा.लि.भवानी प्रसाद, सातपूर यांच्यावर विविध कलमान्वये साक्री पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.

विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार व जिल्हा अधीक्षक अधिकारी शांताराम मालपुरे, तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे, मोहीम अधिकारी प्रदिप निकम, कृषी अधिकारी अभय कोर, रमेश नेतनराव यांच्या सहकार्याने विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी केली.

शेतकरी बांधवांनी अनधिकृत व विना परवाना खते खरेदी करू नयेत. तसेच खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवाना धारक कृषी सेवा केंद्रातून पक्की पावती घेऊन खरेदी करावीत.
-मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग

हेही वाचा :

The post धुळे : बेहेडच्या कृषी केंद्रावर छापा ; बनावट खते जप्त, विक्रेत्यासह कंपनीवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Exit mobile version