धुळे : मंत्री उदय सामंत यांच्यासमोर शिंदे गटातील गटबाजीचे प्रदर्शन

उदय सामंत,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या सत्ता संघर्षात मोठे स्थित्यंतर झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री असणारे उदय सामंत यांच्या धुळे दौऱ्यात गटबाजीचे प्रदर्शन झाले. शिवसेनेच्या पदावर असताना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विमानतळावर मंत्री सामंत यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली नाही. या यादीत या पदाधिकाऱ्यांचे नावच नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. अखेर विमानतळाच्या प्रवेशद्वारावर मंत्री सामंत यांचा सत्कार करून या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली.

राज्यात शिवसेनेमधील वादाची परिणीती सत्ता संघर्षात होऊन मोठे स्थित्यंतर झाले. यात शिवसेनेचा एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत भाजपाच्या सोबत गेला. परिणामी राज्याच्या सत्तेत बदल झाला. या बदलाची परिणिती धुळ्यात देखील पहावयास मिळाली. धुळ्यातून सर्वप्रथम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी शिंदे गटाचा हात पकडला. त्या पाठोपाठ महानगरप्रमुख सतीश महाले, महानगरप्रमुख मनोज मोरे, शहर संघटक संजय वाल्हे, माजी महानगर प्रमुख संजय गुजराती, उपसंघटक शेखर बडगुजर, समाधान शेलार, माजी नगरसेवक सुनील आगलावे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आता जिल्ह्यात शिंदे गटाच्या संघटनाचे कार्य सुरू झालेले नसतानाही गटबाजी सुरू झाल्याचे आज दिसून आले. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील एका मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे धुळ्याच्या गोंदूर विमानतळावर आगमन झाले. या विमानतळावर मंत्री सामंत यांचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात आलेली होती. या यादीमध्ये 33 नावांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे माजी नगरसेवक मनोज मोरे, संजय वाल्हे यांच्यासह कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले. मात्र यावेळी बंदोबस्त असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव सत्काराच्या यादीत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब निदर्शनास येतात मोरे यांनी संतप्त भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. शिंदे गटाचे कार्य प्रामाणिकपणे करत असताना अशी गटबाजी करून डावलले जात असल्याने त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान मंत्री सामंत यांची गाडी विमानतळाच्या प्रवेशद्वारा मधून बाहेर येताच त्यांनी रस्त्याच्या कडेला एका रांगेत उभ्या असणाऱ्या या नाराज कार्यकर्त्यांजवळ गाडी थांबवली. यावेळी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर मोरे आणि त्यांच्या समर्थकांनी सत्कार केला. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकाऱी आणि मनोज मोरे यांच्यात जुगलबंदी रंगली. अखेर धुळ्यात आल्यानंतर भेट घेऊन यावर चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिल्याने या वादावर तुर्त पडदा पडला.

हेही वाचा :

The post धुळे : मंत्री उदय सामंत यांच्यासमोर शिंदे गटातील गटबाजीचे प्रदर्शन appeared first on पुढारी.