धुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आंदोलन, , सत्ताधारी भाजप विरोधात निदर्शने

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या चार वर्षांपासून धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून चार वर्षात धुळेकरांच्या नजरेत भरेल असे एकही काम सत्ताधारी भाजपेयींना करता आले नाही. विकासाच्या नावाखाली आलेल्या शेकडो कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. फक्त बोगस कामे टाकणे आणि कोट्यावधीचे बील काढणे एवढेच काम आतापर्यंतच्या महापौरांनी केले असल्याचा आरोप करीत आज शिवसेनेने महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन केले आहे. विकास कामांच्या नावाखाली केवळ जनतेला तारीख देणाऱ्या भारतीय जनता पार्टी विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

धुळे महानगरपालिकेच्या महापौर व प्रशासनाविरोधात शिवसेनेच्या वतीने आज व्यंग्यचित्राच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मुख्य दरवाजावर जोरदार निदर्शने करीत महापालिकेच्या भ्रष्टाचारा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येऊन महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाडे यांना घेराव घालत समस्यांचा पाढा वाचला.

आंदोलनाच्या वेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आ. प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देविदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, महिला संघटीका हेमा हेमाडे, डॉ. जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, संदीप सूर्यवंशी, आण्णा फुलपगारे, पुरुषोत्तम जाधव, रवि माळी, विनोद जगताप आदींनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर महानगरपालिका प्रशासनाच्या समोर धुळे शहरात असलेल्या दुरावस्थेची माहिती दिली.

महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षांत व त्यानंतरच्या दीड वर्षात दोघा महापौरांच्या कारकीर्दीवर व अकार्यक्षमतेवर तसेच भ्रष्टाचारावर मनपा प्रशासनावर सत्ताधारी स्थायी समितीच्या सदस्यांनीच अनेक वेळा स्थायीत आवाज उठवून भाजपा नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. शहराच्या विविध प्रश्नांवर मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारे विद्यमान उपमहापौर फक्त पदासाठीच आवाज उठवत होते. हे देखील आता समोर आले असून गेल्या चार वर्षांत धुळेकरांना फक्त तारीख पे तारीख देण्याचे काम सुरु आहे. जिल्हा वकील संघाला देखील महापौरांनी केवळ आश्वासनावर ठेवले आहे.

धुळे शहरासाठी कोट्यावधी रुपये विविध योजनेतून मंजुर झाले. शहरासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून फक्त दसरा, दिवाळी, आखाजी अशा प्रकारे तारीख पे तारीख देत दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले जात आहे. अद्यापही या योजनेची 50 टक्के काम देखील पूर्ण झालेले नसून धुळेकरांना दररोज पाणी कधी मिळणार त्यापेक्षा नियमित दोन-तीन दिवसाआड का होईना पाणी देणे गरजेचे आहे. पण बिघडलेली यंत्रणा कोलमडून पडलेले वेळापत्रक यामुळे पुरेशा प्रमाणात जलकुंभच भरले जात नाहीत. त्या ठिकाणी मुबलक पाणी असून देखील नियोजनात सत्ताधारी कमी पडल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या नावाखाली भाजपाच्या मंत्र्यापासून खासदार ते नगरसेवक सगळ्यांनीच आश्वासने दिलीत. पण नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात अपयशच आले. याला फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.

शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून बारापत्थर ते फाशीपुल, चितोड रोड, पत्रकार भवन ते दत्त मंदिर, देवपूर, साक्री रोड, आझाद नगर, नकाणे रोड, वलवाडी आदी परिसरातील मुख्य वसाहतीतील रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. अनेकदा रस्त्यांवर रस्ते बनविले गेले. त्याचे लाखो रुपयांचे बिले काढले गेले पण अद्यापही कॉलनी परिसरासह मुख्य रस्त्यांची अवस्था जैसे थे असून दिवाळी नंतर रस्त्यावरील खड्डे देखील बुजविले गेले नाहीत. तिच अवस्था आरोग्य समस्यांची असून वेळेवर धुरळणी, फॉगींग होत नसल्याने डासांच्या समस्यामुळे नागरिक हैराण झालेले असून मलेरिया डेंग्यूची साथ वाढत आहे.

धुळे महानगरपालिकेच्या दवाखान्यांची अवस्था बिकट झाली असून आरोग्य यंत्रणेवर अंकुश नसल्याने साथीचे आजार नित्य नियमाने पसरत असून गोवरची आलेली साथ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अद्यापही शहरातील 40 टक्के भागातील कचरा नियमित उचलला जात नसून शहराच्या चहूबाजुला कच-याचे उकीरडे निर्माण झालेले आहेत. कॉलनी परिसरात घंटागाड्या नियमित कचरा उचलण्यास येत नाहीत, मुख्य रस्त्यांवरील बांधकामाचे डॅबरेज पडून असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्तेच बंद झाले आहेत. व्यापारी भागातील कचरा कुंड्या दररोज उचलल्या जात नाहीत. तीच अवस्था पथदिव्यांच्या बाबतीत असून अद्यापही शहरातील अनेक भागातील स्ट्रीट लाईट बदलविण्यात आलेले नाही. मनपाने नवीन स्ट्रीट लाईट बसविले त्या दिव्यांचा प्रकाशच पडत नसून महिनाभरात हे स्ट्रीट लाईट खराब होत असून ठेकेदाराने बोगस कंपनीचे दिवे लावण्याने अर्धे अधिक शहर अंधारात असते. त्यातच मनपा लाईट विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक भागातील दिवे सायंकाळी लावलेच जात नाहीत. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करुन देखील पथदिवे बदलविले जात नाहीत ही शोकांतिका आहे. अशी टीका यावेळी करण्यात आली.

एकंदरीतच सर्व मुलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपा व धुळे शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना अपयश आलेले आहे. त्यामुळे आता नवीन महापौर बदलले तरी समस्या या जैसे थे च राहणार असून फक्त टक्केवारी घेणे, बिले काढणे आणि विकासाच्या नावाने पत्रकबाजी करणे एवढीच कामे सत्ताधारी करु शकतात. वकील संघाला दिलेला 45 दिवसाचा अल्टीमेटम संपून 60 दिवस झाले. तरी देखील ढिम्म प्रशासन जागे झाले नाही. आता या पुढे धुळेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना आंदोलनातून प्रशासनाला जागे करेल. येणाऱ्या काळात तीव्र स्वरुपात आंदोलने करेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. शिवसेनेच्या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नी संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा : 

The post धुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आंदोलन, , सत्ताधारी भाजप विरोधात निदर्शने appeared first on पुढारी.