धुळे : मयत तरुणाच्या खिशातील बसच्या तिकिटावरून पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्यांना बेड्या

police tapas www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पोटच्या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खुनात मयत तरुणाच्या पत्नीसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेषतः कोणताही पुरावा नसताना मयताच्या खिशातील बसच्या एका तिकिटावरून धुळ्याच्या पोलीस पथकाचा तपास मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला. यातून मयताच्या पत्नीसह चौघांना वेड्या ठोकण्यात आले आहेत.

शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे हात ओढणीच्या साहाय्याने बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली. घटनास्थळावर मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नव्हता. मात्र मयत तरुणाच्या खिशामध्ये असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका तिकिटाच्या मदतीने पोलीस तपास थेट मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील पोरबंदर गावापर्यंत जाऊन पोहोचला. मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या पथकाने सुरू केला. मयत तरुणाच्या अंगठ्याजवळ मुकेश नाव असल्याचे दिसून आले. मात्र त्या पुढील अक्षरे मृतदेह खराब झाल्यामुळे वाचणे अवघड होते. त्यातच मृतदेहाच्या खिशात असलेल्या तिकिटावरून तो चोपडा येथून शिरपूरपर्यंत आल्याचे निदर्शनास आले. तिकिटावर असलेली तारीख पाहता सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले. या फुटेजमध्ये तरुणाबरोबर एक महिला देखील बसमध्ये बसल्याचे निदर्शनास आले. यावरूनच या गुन्ह्याची उकल झाली. हा मयत तरुण मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील चाचऱ्या येथे राहणारा मुकेश राजाराम बारेला असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले असता यातील गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी मुकेश बारेला याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून सुशील उर्फ मुसल्या जयराम पावरा, दिनेश उर्फ गोल्या वसुदेव कोळी आणि जितू उर्फ तुंगऱ्या लकडे पावरा या तिघांचा खूनप्रकरणी संबंध असल्याची बाब निदर्शनास आली. संबंधित आरोपींना गुजरात राज्यातील पोरबंदर येथून पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

मयत मुकेश बारेला हा गेल्या दोन वर्षापासून त्याच्या पत्नीपासून विभक्त होता. त्यामुळे संबंधित महिला ही सुशील पावरा याच्या समवेत राहत होती. बारेला याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. हे दोन्ही मुले बारेला याच्याकडेच राहत होती. मात्र बारेला हा या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून त्याच्या पत्नीने त्याचा काटा काढण्याची योजना तयार केली. त्यासाठी तिघाही मारेकऱ्यांची मदत घेतली. आपल्याला शिरपूर तालुक्यात नातेवाईकाकडे जायचे असल्याचे कारण करून मुकेश बारेला याला बसने आणण्यात आले. यानंतर त्याचा गळा आवळून खून करून मक्याच्या शेतात आड वळणाला त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अटक केलेल्या चौघांना पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि थाळनेर पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना दहा हजाराचे पारितोषिक पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिले आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा:

The post धुळे : मयत तरुणाच्या खिशातील बसच्या तिकिटावरून पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्यांना बेड्या appeared first on पुढारी.