धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाचा खून

खून

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या केल्याची घटना मोहाडी उपनगरात घडली आहे. या हल्ल्यापासून मयत युवकाचा बचाव करणाऱ्या त्याचा भाऊ, आई आणि मित्रालाही मारहाण करण्यात आली. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोहाडी उपनगरातील दंडेवाला बाबा नगरात राहणारा अमाेल मरसाळे असे मयत युवकाचे नाव आहे. अमोलचा भाऊ अजय विश्वास मरसाळे याने फिर्याद दाखल केली. दंडेवाला बाबानगर परिसरात रोकडोबा हनुमान मंदिर आहे. या मंदिराजवळ अमोल मरसाळे याच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यात आला. माझ्या भावाशी वाद घातला होता, यापुढे जर तुम्ही नीट वागले नाही तर राहणे मुश्कील करुन टाकू अशी धमकी दिली. या वादाचे पर्यवसन नंतर मारहाणीत झाले. अचानक झालेल्या आरडाओरडीमुळे बघ्यांची गर्दी जमा झाली. मारहाण होत असल्याचे लक्षात येताच मयताची आई शोभाबाई आणि मित्र जाकीर पिंजारी मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. चौघांपैकी एकाने त्याच्या हातातील चाकूने सपासप वार केल्याने अमोलच्या डाव्या कानाजवळ गंभीर दुखापत झाली. त्याच्या डाव्या पायाच्या मांडीवर चाकूने भोसकण्यात आले. यानंतर चौघा मारेकर्‍यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. गंभीर अवस्थेत अमोल याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुनील नंदू आव्हाळे, बबलू नंदू आव्हाळे, दिनेश सुभाष धनगर, सागर नंदु आव्हाळे (सर्व रा. दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) यांच्या विरोधात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा:

The post धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाचा खून appeared first on पुढारी.