धुळे : लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ज्ञ अटकेत

धुळे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : वाणिज्य प्रयोजनासाठीचा विद्युत पुरवठा देण्यासाठी डिमांड नोट काढण्यासाठी वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांच्या सांगण्यानुसार लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला गुरुवारी धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

शिरपूर तालुक्यातील वरवाडे येथे राहणाऱ्या तक्रारदाराचे खंबाळे शिवारामध्ये बियर बार आहे. यामध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी विद्युत पुरवठा घ्यावयाचा असल्याने तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे ऑनलाईन अर्ज केला होता. यानंतर त्यांनी कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रती आणि त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून त्यांच्याकडे अर्ज जमा केला. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे वीज कनेक्शन जोडण्याची डिमांड नोट काढण्यासंदर्भात वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश माळी यांना भेटण्यास सांगितले.

यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश माळी यांनी तक्रारदार यांच्या खंबाळे येथील बियर बार येथे जाऊन त्यांच्याकडून डिमांड नोट काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासाठी तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यात कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांच्या सांगण्यावरून वरिष्ठ तंत्रज्ञान निलेश माळी यांनी दहा हजार रुपयांची मागणी केल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या पथकाने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून पैसे घेत असताना निलेश माळी यांना रंगेहात पकडण्यात आले. या संदर्भात समाधान पाटील आणि निलेश माळी या दोघांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा;

The post धुळे : लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ज्ञ अटकेत appeared first on पुढारी.