धुळे : लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षभर मोफत धान्य

रेशनकार्ड

धुळे: पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ रुपये प्रति किलो या दराने तांदूळ, 2 रुपये प्रति किलो या दराने गहू व १ रुपये प्रति किलो या दराने भरडधान्य उपलब्ध करून देण्यात येत होते. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेतंर्गत सर्व लाभार्थ्यांना नववर्ष जानेवारी २०२३ पासून पुढील एका वर्षाकरिता मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे जिल्ह्यात 14 लाख 64 हजार 810 रेशनकार्ड लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत मोफत धान्य मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत 3 लाख 1 हजार 802 शिधापत्रिकाधारक असून त्यामध्ये अंत्योदय योजनेतंर्गत 75 हजार 15 व प्राधान्य कुटुंब योजनेतील 2 लाख 26 हजार 787 असे एकूण 3 लाख 1 हजार 802 पात्र शिधापत्रिका धारकांमधील एकूण १४ लाख ६४ हजार ८१० पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे. कोरोना काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना दरमहा रेशन दुकानातून मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत होते. कोरोना काळात मोफत दिले जाणारे अन्नधान्य डिसेंबर 2022 पासून बंद करण्यात आले. मात्र, आता या शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत मोफत अन्नधान्य दिले जाणार असल्याने अन्नधान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत लाभार्थ्यांची कोणतीही तक्रार असल्यास तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मिसाळ यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post धुळे : लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षभर मोफत धान्य appeared first on पुढारी.