धुळे : लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी 2 कोटींची तरतूद

hospital

धुळे : पुढारी वृत्तसेवा

लामकानी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता एकूण 2 कोटी 12 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या बांधकामास आता गती मिळणार असल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लामकानी ग्रामीण रुग्णालयाच्या 21 कोटी 27 लक्ष रुपयाच्या आराखड्यास या आधीच मान्यता मिळाली आहे.

धुळे तालुक्यातील लामकानी हे गाव साक्री, शिंदखेडा आणि धुळे या तीन तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे दहा ते पंधरा हजार आहे. तर तीन तालुक्यातील परिसरातील विविध गांवाचा दैनंदिन संबध येत असतो. धुळे शहर हे या गावांपासून लांब असल्याने तातडीने वैद्यकीय उपचार होण्यासाठी लामकानी ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी लामकानीसह परिसरातील नागरीकांची होती. त्यामुळे आमदार कुणाल पाटील यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. तर आमदार कुणाल पाटील यांनी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबधित विभागाला दिल्या होत्या. या प्रस्तावास मान्यता मिळावी म्हणून कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विविध अधिवेशनात तारांकीत प्रश्‍नांतून आवाज उठविला होता. अखेर पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि लामकानी ग्रामीण रुग्णालयाच्या 21 कोटी 27 लक्ष रुपयांच्या आराखड्यास काही महिन्यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी निधीची तरतूद होणे आवश्यक होती.

त्यासाठी आ. कुणाल पाटील यांनी सतत पाठपुरावा करुन लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी तातडीने भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार आज पासून सुरु झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये सन 2022-23 करीता लामकानी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी एकूण 2 कोटी 12 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता लामकानी रुग्णालयाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे कुणाल पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post धुळे : लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी 2 कोटींची तरतूद appeared first on पुढारी.