Site icon

धुळे : वादाला फाटा देत राष्ट्रवादी भवनावर दोन्ही गटाने फडकविला तिरंगा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्यात गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील ताई व दादा या दोन्ही गटांमध्ये वाद सुरू आहे. पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रवादी भवनावर दोन्ही गटातील सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत एकत्रितपणे ध्वजारोहण केले. दोन्ही गटाकडून स्वातंत्र्य दिनी एकत्रित येणे हा चर्चेचा विषय होता.

गेले काही दिवसापासून धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उघडपणे दोन गट पडलेले होते. राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेण्याच्या कारणावरून या दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाला होता. दोन्ही गटांनी राष्ट्रवादी भवनाला आपले कुलूप लावून त्यावर आपला दावा सांगितला होता. तर वरिष्ठ स्तरावरून सबुरीचा सल्ला देण्यात आल्याने तुर्त हा वाद थांबला आहे. परंतु काल स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दोन्ही गटांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सामंजस्य दर्शन धुळे शहरांमध्ये दिसून आले. सर्व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये चांगला संदेश दिला. एकत्रितपणे ध्वजारोहन व राष्ट्रगीत करून एकमेकांबरोबर अल्पोपहार व चहापाणी सुद्धा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनही गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ध्वजारोहण केले.

दादा गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, ताई गटाचे सारांश भावसार, जोसेफ मलबारी, एन. सी पाटील, माजी महापौर कल्पना महाले यांच्या संयुक्त हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर किरण शिंदे व रणजीत भोसले यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन मंगेश जगताप व भिका नेरकर यांनी केले.

हेही वाचा : 

The post धुळे : वादाला फाटा देत राष्ट्रवादी भवनावर दोन्ही गटाने फडकविला तिरंगा appeared first on पुढारी.

Exit mobile version