धुळे : विनापरवानगी एंटी कास्ट बायकर मार्चला पोलीस प्रशासनाने रोखले

धुळे: पुढारी वृत्तसेवा

मेहरगाव येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार दि.२ सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या  अँटी कास्ट बायकर्स मार्चला पोलिसांनी प्रतिबंध करत शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे पोळा सणाच्या दिवशी दोन गटात बैलांची मिरवणूक काढण्यावरून वाद झाला. त्यानंतर एका गटाने त्यांच्यावर गावात बहिष्कार टाकल्याचा आरोप केल्याने वातावरण अधिकच चिघळले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाची समजूत काढण्यासाठी गावात शांतता समितीची बैठक घेतली. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सत्यशोधक संघटनेच्या वतीने शुक्रवारी, दि.२ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अँटी कास्ट बायकर मार्चचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सिद्धार्थ जगदेव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी रॅलीचे आयोजन करत सहभाग नोंदवला. मात्र रॅलीस पोलीस प्रशासनाने मंजुरी दिलेली नसल्यामुळे रॅलीस प्रतिबंध  करण्यात आला. अँटीकास्ट बाईकर्स मार्चसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ जमलेल्या कॉम्रेड सिध्दार्थ जगदेव, सचिन बागुल, मनोज नगराळे, शरद वेंदे, राकेश अहिरे, सिध्दांत बागुल, जितेंद्र अहिरे, संदीप बोरसे, मनीष दामोदर, अतुल बैसाणे, अमोल शिरसाठ, मानसी पवार, निलीमा भामरे, नेहा बागुल यांच्यासह शंभरावर कार्यकर्त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान या संदर्भात भूमिका मांडताना सिद्धार्थ जगदेव यांनी अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच बहिष्कार टाकला जात असताना जिल्ह्यातील खासदार, माजी आमदार ,जिल्हा परिषद सदस्य तसेच मेहेरगाव येथील सरपंच यांनी कोणती भूमिका बजावली, असा संतप्त सवाल केला .निवडणुकीच्या कालावधीमध्ये वाडी वस्त्यांवर मत मागणारे हे नेते बहिष्कार टाकतेवेळी ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप यावेळी जगदेव यांनी केला. तसेच मेहरगाव येथे सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याकरता हा मार्च काढला जात असताना पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन करू दिले नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

हेही वाचा:

The post धुळे : विनापरवानगी एंटी कास्ट बायकर मार्चला पोलीस प्रशासनाने रोखले appeared first on पुढारी.