धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा

आमदार फारुक शाह www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून सुद्धा जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जात जावे लागत आहे. याबाबत कारणांचा शोध घेण्यासाठी आयोजित बैठकीत महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे नाट्य घडले. त्यामुळे संतप्त झालेले आमदार फारुक शाह यांनी दोन्ही अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत विज आणि पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मनपाला टाळे ठोकण्याचा तर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

धुळे शहराला तापी पाणी योजना तसेच नकाने आणि डेडरगाव तलावामधून पाणीपुरवठा केला जातो. या तीनही ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध असताना धुळे येथील जनतेला आठ ते दहा दिवसांच्या फरकाने पाणीपुरवठा केला जातो आहे. विशेषत: गेल्या दोन महिन्यांपासून अनेक भागांमध्ये बारा दिवसानंतर पाणी मिळत असल्याने जनतेमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार (दि.26)  आमदार फारुक शाह यांनी महवितरण कंपनीचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक गुलमोहर विश्रांत गृहावर आयोजित केली. या बैठकीमध्ये पाणीटंचाई होण्याची कारणे मांडण्याची सूचना करण्यात आली. यावेळी महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता म्हस्के, कार्यकारी अभियंता पाटील, महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत ओगले, वीज विभागाचे कर्मचारी सी. सी. बागुल हे यावेळी उपस्थित होते. बैठकीत शहराच्या पाणी पुरवठ्यावरुन महावितरण कंपनीचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्यातच चांगलीच जुंपली. वीज खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज पुरवठा होणे यामुळे पाणी ओढणारे पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाक्या भरू शकत नाहीत. अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी देत असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळेच धुळे शहराला पाणीटंचाई तोंड द्यावे लागत असल्याचे खापर फोडण्यात आले. तर महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी तांत्रिक बिघाड होताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचून तातडीने वीज सुरळीत करण्याचा प्रयत्न करते. मात्र वादळी वार्‍यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. अशी उत्तरे महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी आयोजित बैठकीत महावितरण कंपनीचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यातच शाब्दिक वाकयुद्ध झाले. त्यामुळे आमदार फारुक शाह यांनी संतप्त होत दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला. तसेच आवश्यक त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून 20 मे पर्यंत दोन दिवसाआड पाणी पुरवठा करा अन्यथा मोर्चा काढून महापालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्याचा इशारा धुळे मनपाच्या अधिकार्‍यांना तर शहरातील वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास संबंधित अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा महावितरणच्या अधिकार्‍यांना आमदार फारूक शहा यांनी दिला आहे.

हेही वाचा:

The post धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा appeared first on पुढारी.