धुळे : वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे धुळे जिल्ह्यासह शेजारील नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील गरजू रुग्णांसाठी औषधोपचार करून घेण्याचे हक्काचे ठिकाण आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ मोठी असते. हा परिसर स्वच्छ राहावा, रुग्णांना लवकर आराम मिळावा, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतेचे महत्व कळावे आणि स्वच्छता पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

आज जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे प्रशासन आणि धुळे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी स्वच्छतेसाठी एकवटले होते. जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी तब्बल तीन तास स्वच्छता मोहीम राबवित उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयास भेट दिली होती. त्यावेळेस त्यांनी स्वच्छतेबाबत विविध सूचना दिल्या होत्या. तसेच स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार केला होता. या निर्धाराला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व वरीष्ठ अधिकारी, महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभागी होत बळ दिले. जिल्हाधिकारी शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., महानगरपालिका आयुक्त टेकाळे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी स्वच्छता अभियानात सहभागी असल्याचे पाहून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुणकुमार मोरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी यांनी ही उत्स्फूर्तपणे सहभागी होत परिसरात स्वच्छता केली.

या अभियानात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, हेमांगी पाटील, सुरेखा चव्हाण, डॉ. श्रीकुमार चिंचकर, महेश जमदाडे, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. मुकरम खान, डॉ. अमिता रानडे, डॉ. राजेश सुभेदार,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. ए. तडवी, गणेश मोरे, महानगरपालिका उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर आदींसह विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानास आमदार मंजुळाताई गावित यांनी भेट देऊन पाहणी केली.

स्वच्छता सर्वात महत्वाची बाब आहे. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी, तर स्वच्छता सर्वात मोठी आवश्यक बाब आहे. त्यामुळेच आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आगामी काळात
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी स्वच्छता राखावी.

जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे

हेही वाचा :

The post धुळे : वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन appeared first on पुढारी.