Site icon

धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्हयासह महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागात रिक्त असलेली वैद्यकीय कर्मचार्‍यांची पदे आणि रुग्णालयाच्या कमतरतेमुळे पशुपालक शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. परिणामी पशुधनाचे आरोग्य वैद्यकीय सेवेअभावी धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने पशुवैद्यकिय विभागात कर्मचार्‍यांची पदभरती करुन पशुपालकांची गैरसोय दूर करण्याची मागणी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी मंगळवारी (दि.२३) अधिवेशनात केली.

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. यामध्ये आ. पाटील यांनी पशुपालक शेतकर्‍यांचा प्रश्‍न मांडला. पशुपालन हा शेतकर्‍यांचा दुय्यम आणि तितकाच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा व्यवसाय आहे. मात्र पशुपालनाचा व्यवसाय वैद्यकीय सेवेअभावी धोक्यात आला आहे. याबाबत त्यांनी विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचना मांडली. त्यात म्हटले आहे की, धुळे तालुका आणि जिल्ह्यात पशुवैद्यकीय सेवा व दुग्ध व्यवसाय संबधित पशुपालकांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. गेल्या 18 वर्षापासून शासनाने राज्यस्तरावर पशुधन पर्यवेक्षकाचे एकही पद भरलेले नाही. पशुसंर्धन विभागात आजही शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांवर अतिरिक्त भार येत असून पशुसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय रुग्णालयातील पशुधन पर्यवेक्षक व शिपाई कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याने ती तातडीने भरण्याची आवश्यकता आहे. पशुपालकांच्या समस्यांबरोबच ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्याही वाढविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नास उत्तर देताना सांगितले, पशुसंवर्धन रुग्णालयासंदर्भात समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अहवालानंतर उचित कार्यवाही केली जाणार आहे. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट-अ आणि पशुधन विकास अधिकारी गट-अ संवर्गातील पद भरतीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्तपदे भरण्यासंदर्भात वित्त विभागाकडून सुधारित आकृतीबंध मंजूर झाल्यानंतरच पदभरतीची कार्यवाही संकल्पित आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा अखंडीतपणे पुरविण्यासाठी बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत पशुधन पर्यवेक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले.

हेही वाचा:

The post धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी appeared first on पुढारी.

Exit mobile version