धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा – आमदार गोपीचंद पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्यातले सरकार स्थिर असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटांकडे लक्ष देऊ नका, अशी टीका त्यांनी केली आहे.

धुळ्यात कोळी समाजाच्या आक्रोश मोर्चाला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांसमवेत संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राज्यात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक आमदार हा विचाराने भारावून काम करतो. विरोधी पक्षात असताना देखील एकही आमदार हा सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीकडे गेला नाही. पण महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आमदार मात्र फुटले. भारतीय जनता पार्टीचे आमदार विचाराने भारून काम करतात. पण पवारांचे सरकार गेले की लोक पळतात. असे सांगतानाच शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात या न चालणाऱ्या नोटांकडे लक्ष देऊ नका, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पहाटेच्या शपथविधी संदर्भात राज्यात आरोप प्रत्यारोप होत असताना पडळकर यांनी त्यात उडी घेतली आहे. शरद पवार यांचा चेहरा विश्वासघात आणि पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रवृत्तीने काळवंडला होता. गेल्या महिन्यातच त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे. पहाटेच्या शपथविधी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच वाक्य टाकल्याने पवार यांचा मूळचा काळवंडलेला चेहरा आता अधिकच काळा झाला असल्याची गंभीर टीका यावेळी पडळकर यांनी केली.

तसेच राज्यात 1995 ते 99 आणि 2014 ते 19 हा कालावधी सोडला तर बराच काळ शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणारे सरकार होते. या कालावधीत आदिवासी नेते त्यांच्या जवळचे होते. याच लोकांनी षडयंत्र करून आदिवासी असणाऱ्या गरीब जमातीवर अन्याय केला आहे. आदिवासी आणि धनगर समाजाला आरक्षण न मिळण्याच्या प्रक्रियेतील शरद पवार हे सूत्रधार आहेत. म्हणूनच मी शरद पवार यांच्यावर आरोप आणि टीका करतो असे देखील पडळकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

The post धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा - आमदार गोपीचंद पडळकर appeared first on पुढारी.