धुळे : संरक्षित सिंचन क्षेत्रवाढीसाठी बांधणार 1790 वनराई बंधारे

वनराई बंधारा www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून एक हजार 790 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

सन 2022-23 या वर्षात नाशिक विभागातील धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले आहे. सद्य:स्थितीत ओढे, नाल्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पावसाळा संपत आल्याने ओढे, नाल्यांमधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी नाशिक विभागात देखील लोकसहभागातून 11 हजार 560 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरू असतो. हा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून जलसाठा तयार करण्यात येणार आहे.

कसा असतो वनराई बंधारा :

बिगर पावसाळी हंगामातील पिकांसाठी संरक्षित पाणी, ग्रामपातळीवर पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा (सिमेंट/खतांची रिकामी पोती, माती, वाळू आदी) वापर करुन तात्पुरत्या स्वरुपात बांध बांधता येतो. त्यालाच वनराई बंधारा म्हटले. वनराई बंधाऱ्याची जागा निवड करताना वनराई बंधारे पाणलोट क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्राच्या बाहेरही घेता येतात. ज्या गावात पाणलोट विकासाची कामे सुरू नाहीत, अशा गावात वनराई बंधा-यांची कामे मोठ्या प्रमाणात घेतल्यास पाणी टंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. वनराई बंधाऱ्यांकरीता पाणलोट क्षेत्राची अट नसते. त्यासाठी तांत्रिक निकष विचारात घेवून जागेची निवड करणे लाभदायक असते. प्रथम नाल्याची पाहणी करुन कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जलसाठा करणे शक्य होईल, अशी जागा निवडली जाते. नाला अरुंद व खोल असावा, साठवण क्षमता पुरेशी असावी. नाल्याच्या तळाचा उतार सर्वसाधारणपणे दोन ते तीन टक्के असावा लागतो. या बंधाऱ्याची उंची दीड मीटरपेक्षा जास्त नसावी. वनराई बंधाऱ्याचा बांधकाम कालावधी हा पावसाळा संपल्यानंतर नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी कामाचा कालावधी सात ते पंधरा दिवसांपर्यंत असावा. पावसाळ्यानंतरचा सुरू असलेला पाण्याचा प्रवाह विचारात घेऊन सर्वसाधारणपणे प्रवाह बंद होण्यापूर्वी अडविला जाईल, या दृष्टीने ठरविण्यात येतो. या कालावधीमध्ये पूर येण्याची शक्यता कमी असल्याने नदी नाल्यांच्या पाझराच्या पात्रात पाण्याचा प्रवाह सुरु असतो.

वनराई बंधाऱ्याचे लाभ

वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरीता, गुरांना पाणी पिण्याकरिता, वनराई बंधाऱ्याच्या आजूबाजूला असलेल्या विहिरीच्या भूजल पातळीत वाढ होण्याकरीता मदत होते. वनराई बंधाऱ्याचा जलसाठ्यामधून पाण्याचा उपसा करुन रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला, कडधान्ये, कलिंगड, रब्बी तृणधान्ये, गळित धान्ये यासारखी पिके घेण्यासाठी मदत होते. अपेक्षित संरक्षित सिंचन क्षेत्र बंधाऱ्याद्वारे सरासरी दोन हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन उपलब्ध होईल. काही ठिकाणी जास्तीचा जलसाठा उपलब्ध होवून सिंचन क्षेत्रात वाढ होवू शकेल. त्यानुसार नाशिक विभागात नाशिक जिल्हा-5200, धुळे जिल्हा- 1790, नंदुरबार जिल्हा-1860, जळगाव जिल्हा-2710, असे एकूण-11 हजार 560 बंधारे बांधण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या माध्यमातून अंदाजित 23 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनखाली येईल, असे अपेक्षित आहे. वनराई बंधारे बांधण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व गावांमधील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post धुळे : संरक्षित सिंचन क्षेत्रवाढीसाठी बांधणार 1790 वनराई बंधारे appeared first on पुढारी.