धुळे : समर्थ खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा

धुळे (पिंपळनेर), पुढारी वृत्तसेवा
येथील श्री. समर्थ खंडोजी महाराज यांच्या १९४ व्या नामसप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. विठ्ठल मंदिरात पहाटे महाकाकड आरती झाली. रात्री ११ वाजता विठ्ठल मंदिरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या रात्रीला पूर्वीपासून पालखीची (कत्तलची रात्र) असे संबोधले जाते. पालखीत खंडोजी महाराजांच्या पादुका, तीनशे वर्षांपूर्वीची हस्तलिखित गीता व श्रीकृष्णाची पुरातन मूर्ती ठेवली जाते.

पालखी सोहळ्यात विविध ठिकाणांहून आलेल्या दिंड्या सहभागी झाल्या. मधुर संगीत व कीर्तनाच्या तालावर भक्त तल्लीन झाले होते. समाधी दर्शनावेळी शांताई एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी दिंडीची शोभा वाढवली होती. पालखी मार्गात विविध मंडळांकडून रांगोळी काढून पुष्पवृष्टी करण्यात आली. तर विविध मंडळ, सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. १९४ वर्षाचा जातीय सलोखा आजही कायम ठेवत मध्यरात्री शहरातील जामा मशिदी समोर जहागिरदार कुटुंब व मुस्लिम बांधवांच्या वतीने योगेश्वर महाराज देशपांडे यांना मानाची वस्त्रे देऊन पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विविध मंडळांकडून पारंपारिक पद्धतीने पायदळी सोंगे व पौराणिक दृश्यांवर आधारीत ४ सजीव चित्ररथ सादर करण्यात आले.

कलियुग सांस्कृतिक कला मंडळाचा यावर्षी अमृत महोत्सवानिमित्त नाना चौक यांच्या वतीने विरभद्र महाकाल या वहनाचा सजीव देखावा साकारण्यात आला होता, प्रथम क्रमांक देण्यात आला. युवा संघर्ष गृपचा अर्धनारीश्वर (शिवपार्वती) हा सजीव देखावा आकर्षण ठरला. भोईराज मित्र मंडळाच्या वतीने वराह अवतार, श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने नृसिह शरंभ अवतार व जागृती ग्रुप बाजार पेठच्या वतीने मधु कैटपाचा वध असे देखावे साकारण्यात आले.

कुस्त्यांची रंगली दंगल…

कुस्ती मैदानावर भव्य कुस्त्यांची दंगल रंगली. यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली येथील नामवंत पहेलवानांनी डावपेच खेळले व आपले कौशल्य दाखवून कुस्त्या जिंकल्या. विजेत्यांना रोख रक्कमेसह बक्षीसे प्रदान करण्यात आली.

हेही वाचा :

The post धुळे : समर्थ खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा appeared first on पुढारी.