Site icon

धुळे : साक्रीतील स्वीटच्या दुकानाला भीषण आग

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

येथील धुळे रोडवरील सागर स्वीट हॉटेलमध्ये काल रात्री ११ वाजेच्या सुमारास स्फोट होऊन अचानक आग लागली. या आगीत हॉटेलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. यात सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती हॉटेल मालक नैनाराम चौधरी यांनी दिली.

शहरात धुळे रोडवर नैनाराम चौधरी यांची सागर स्वीट ही हॉटेल आहे. काल रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर दोन कारागिर नेहमीप्रमाणे वरच्या मजल्यावर झोपलेले होते. यावेळी रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक स्फोट होऊन मोठा आवाज झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले. पाहता पहाता आगीने संपूर्ण हॉटेल आपल्या कवेत घेतले. या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. परंतु,बंब उशीराने १ वाजता दाखल झाले. तोपर्यंत हॉटेलमधील सर्व साहित्य व पदार्थ जळून खाक झाले होते. डीप फ्रिजचा स्फोट झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

मोठा अनर्थ टळला
या हॉटेलच्या दोन्ही बाजूंना हॉस्पिटल आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची भीती होती. मात्र सुदैवाने तसे काही घडले नाही. शिवाय हॉटेल मालकाने सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना या ठिकाणी केलेली नव्हती. राजस्थानातील अनेकांनी साक्रीत अशा हॉटेल थाटल्या असून सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवसाय केला जातो. परिणामी, आजुबाजूच्या लोकांच्या जीवितालाही धोका संभवतो. भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून अशा हॉटेलांची तपासणी करण्याची गरज यावेळी स्थानिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

The post धुळे : साक्रीतील स्वीटच्या दुकानाला भीषण आग appeared first on पुढारी.

Exit mobile version