धुळे : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड

लाच प्रकरण

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सातबारा उताऱ्यावर नाव बदलून मिळण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर तालुक्यातील पिंपळे येथील तलाठ्यास धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.

शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने या संदर्भात धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शेतक-याने सातबारा उताऱ्यावर नाव बदलून मिळावे यासाठी तलाठी ज्ञानेश्वर बोरसे यांच्याकडे अर्ज केला होता. या संदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील त्यांनी केली होती. मात्र या कामासाठी बोरसे यांनी आठशे रुपये लाचेची मागणी केली. याबाबत शेतक-याने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे आणि मंजीत सिंग चव्हाण यांनी या तक्रारीची पडताळणी केली. यानंतर लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडण्यासाठी भूषण खलाणेकर, भूषण शेटे, प्रशांत बागुल, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, संदीप कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, गायत्री पाटील, रोहिणी पवार आदी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला. यावेळी ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे बोरसे यांनी पुन्हा लाचेची मागणी करून 800 रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये गरजू व्यक्तींकडून लाच मागणाऱ्या लाचखोराचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा :

The post धुळे : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड appeared first on पुढारी.