Site icon

धुळे : सायने येथे असंख्य मेंढ्या दगावल्याने लाखोंची हानी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीटीमुळे धुळे तालुक्यासह जिल्हयातील शेतकरी हैराण झाला आहे. धुळे तालुक्यात अद्याप पंचनाम्याचे कामही सुरु झाले नाही. जिल्हयातही हे काम संथगतीने सुरु आहे. शेतकर्‍यांच्या हाता – तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाचे त्वरीत पंचनामे करुन सोबतच तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी आज विधानसभेत केली.

दरम्यान सायने (ता.धुळे) येथील मेंढपाळांच्या मेढ्या धरणगाव तालुक्यातील पिंपळे खु. येथे  चारण्यासाठी गेल्या होत्या . या ठिकाणी चरत असतांना मेंढ्यांनी बुरशीजन्य गहू खाल्ल्याने असंख्य मेंढ्या दगावल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मेंढपाळ बांधवांनाही तातडीची मदत देण्यात यावी, अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेनशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. धुळे तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच बुरशीजन्य गहू खाल्ल्याने मेंढ्या दगावल्या. त्यामुळे मेंढपाळांना तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी आज आ.कुणाल पाटील यांनी पॉईट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्या उपस्थित करुन केली.

यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळे तालुक्यासह जिल्हयात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वारा आणि गारपीटीचाही प्रचंड फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, टरबूज, पपई यांच्यासह फळ व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. पिकांचे एवढे मोठे नुकसान होवूनही धुळे तालुक्यात अद्याप नुकसानीचा पंचनामा सुरु नाही. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला गती देवून त्याचसोबत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सानुग्रह नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी आ.कुणाल पाटील यांनी केली. त्यामुळे पुन्हा एकदा धुळे तालुक्यातील अवकाळीचा मुद्दा विधानभवनात मांडल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केले आहे.

सायनेच्या मेंढपाळांची व्यथा विधानभवनात

धुळे तालुक्यातील सायने येथील मेंढपाळ बांधवांच्या शेकडो मेंढ्या बुरशीजन्य गहू खाल्ल्याने दगावल्या. ही घटना पिंपळे खु.ता.धरणगाव (जि.जळगाव) येथे घडली. त्यामुळे आ.कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील सायने येथील मेंढपाळांची व्यथा थेट विधानभवनात मांडली. आ. पाटील म्हणाले कि, सायने ता.धुळे येथील मेंढपाळांच्या सुमारे २५० मेंढ्या धरणगाव तालुक्यातील पिंपळे खु. येथे चरण्यासाठी गेल्या होत्या. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या बुरशीजन्य गहू खाल्ल्याने सुमारे १०० पेक्षाही अधिक मेंढ्या दगावल्या. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याने मेंढपाळ बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणून त्यांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ. पाटील यांनी विधानभवनात मुद्दा उपस्थित करताना केली.

हेही वाचलंत का ? 

 

 

The post धुळे : सायने येथे असंख्य मेंढ्या दगावल्याने लाखोंची हानी appeared first on पुढारी.

Exit mobile version