धुळे : सौर ऊर्जा प्रकल्पाचे साहित्य चोरणारी टोळीतील पाचजण गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील सोलर प्रकल्पाची कॉपर केबल आणि सोलर प्लेट चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी पर्दाफाश केला आहे. टोळीतील पाच जणांना अटक केली असून आणखी चौघांचा शोध पथकाच्या माध्यमातून घेतला जात आहे. टोळक्याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली आहे.

साक्री तालुक्यातील डोमकानी परिसरातील गेल सोलारचे कार्यकारी प्रशासन अधिकारी मोहन नामदेव ब्राह्मणे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कंपनीच्या भामेर आणि सालटेक शिवारातील विविध ब्लॉक मध्ये एकूण 52 हजार रुपये किंमतीची कॉपर केबल वायर आणि सोलारच्या प्लेट अज्ञाताने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी देखील याच संदर्भातील पाच गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याचा तपास करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भामेर येथील दिनेश संजय सोनवणे ,राजेंद्र गोटू सोनवणे आणि सोनू गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे चोरीस गेलेला माल साक्री येथील नदीम खान पठाण सोनू उर्फ वसीम अली शेर अली सय्यद तसेच सलमान शेख सिराज यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या. चोरट्यांच्या ताब्यातून सुमारे 24 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार तसेच सोलर प्लेट, एक फोर्ड कंपनीची कार आणि वेगवेगळ्या कंपनीचे सहा मोबाईल असा तीन लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, चोरीच्या प्रकरणात कॉपर केबल खरेदी करण्यात बबलू उर्फ पेटू मुनाफ खान पठाण, समीर खान पठाण तसेच नईम बेलदार यांचा देखील हात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे.

हेही वाचा:

The post धुळे : सौर ऊर्जा प्रकल्पाचे साहित्य चोरणारी टोळीतील पाचजण गजाआड appeared first on पुढारी.