धुळे : हत्यार घेऊन जाणारे टोळके तालुका पोलिसांच्या ताब्यात; चार तलवारी जप्त

धुळे हत्यारे घेऊन जाणारी टोळी जेरबंद,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील कुसुंबा गावाकडून मालेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर तलवारी घेऊन जाणाऱ्या चौघांना तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या चौघा युवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून ते नेमका कोणता गुन्हा करण्यासाठी जात होते, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

नागपूर सुरत महामार्गावर असलेल्या कुसुंबा गावाकडून मालेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर युवकांचे टोळके हत्यारांचा साठा घेऊन जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक सागर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक सुनील विंचुरकर तसेच प्रवीण पाटील, अविनाश गहिवड, धीरज सांगळे, कुणाल शिंगाने, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे, योगेश कोळी, मुकेश पवार या पथकासोबत कुसुंबा कडून मालेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालण्यास सुरुवात केली. तसेच या मार्गावर सापळा देखील लावला. यावेळी एकाच दुचाकीवरून चार सीट जाणाऱ्या टोळक्यावर पोलिसांना संशय आला. त्यांनी या मोटरसायकलला थांबवण्याचा इशारा केला असता यातील एक युवकाने दुचाकी घेवून पलायन केले. मात्र विशाल नाना भिल, सुनील साहेबराव सोनवणे आणि विकास प्रकाश मालचे या तिघांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या. तर पळून गेलेला सुनील नागो भिल याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुचाकी वरून जाणारे हे चौघे युवक एखादा मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने जात असावेत असा पोलिसांना संशय असून या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पाहिली जात आहे.

हेही वाचा :

The post धुळे : हत्यार घेऊन जाणारे टोळके तालुका पोलिसांच्या ताब्यात; चार तलवारी जप्त appeared first on पुढारी.