धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे या दोन्ही गटाकडून राजकारण सुरू झाले आहे. यात शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी दौरा करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत बैठकीत सूचना दिल्या. मात्र शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने प्रत्यक्ष श्रमदान करून रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून रुग्णालय प्रशासनाबरोबरच केवळ राजकारण करणाऱ्या गटावर टीकेची तोफ डागली आहे.

धुळे जिल्ह्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या काही महिन्यापासून स्वच्छतेच्या प्रश्नावरून तक्रारी होत आहेत. रुग्णालय प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून होत आहे. गेल्या आठवड्यातच समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमिन पटेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निदर्शने करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने जाळ्या बसवण्याची मागणी केली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर काम प्रस्तावित असल्याची माहिती दिल्याने आंदोलन स्थगित झाले. या पाठोपाठ आता साक्रीच्या आमदार मंजुळा गावित तसेच मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी झालेले सतीश महाले, डॉक्टर तुळशीराम गावित यांनी शासकीय महाविद्यालयात जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. या पाहणीमध्ये जिल्हा रुग्णालयात झालेल्या घाणीच्या साम्राज्यावरून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. बैठकीतून जिल्हा रुग्णालय प्रशासनाची झाडाझडती देखील घेण्यात आली. या पाठोपाठ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने बुधवार, दि.14 जिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवली. केवळ आश्वासन देऊन आणि पाहणी करून हा प्रश्न सुटणार नसून श्रमदान करून स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिवसेनेचे 50 कार्यकर्ते दर आठवड्याला रुग्णालयातील विविध वार्डात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयाबाहेरील झुडपे देखील स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेचेसह संपर्कप्रमुख महेश मिस्त्री व हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करनकाळ, माजी आमदार शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील व डॉक्टर सुशील महाजन, ललित माळी, भरत मोरे, नरेंद्र परदेशी यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. यापुढेही रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा:

The post धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण appeared first on पुढारी.