धुळे : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयिताला तरुणांकडून बेदम मारहाण; शांतता समितीची बैठक

मारहाण

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मेहेरगाव येथील दोन गटांत झालेल्या वादाच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेत नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. पोळा सणाच्या दिवशी झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयितास साक्री रोड परिसरातील जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहेरगाव येथील घटनेनंतर गावात बहिष्काराचे अस्र उपसण्यात आल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुसऱ्या गटाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी मेहेरगाव ग्रामपंचायतीत बैठक घेतली. बैठकीत वादातीत दोन्ही गटाला समोरासमोर बसवून त्यांची समजूत काढण्यात आली. दरम्यान या प्रकरणी ॲट्रॉसिटीच्या प्रकरणातील संशयित आरोपी सुरेश मुरलीधर पाटील हा युवक शहरातील राष्ट्रीय महामार्गावर एका वाहनात असल्याची माहिती साक्री रोडवरील तरुणांना मिळाल्याने धनराज शिरसाट, वन्या मलिक, पानपाटील, किरण धिवरे यांच्यासह आठ ते दहा तरुणांनी सुरेश पाटीलला वाहनातून बाहेर ओढत बेदम मारहाण केली. त्यानंतर साक्री रोडवरील भीमनगर परिसरात आणून पुन्हा मारहाण करून त्याचे छायाचित्रण केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post धुळे : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयिताला तरुणांकडून बेदम मारहाण; शांतता समितीची बैठक appeared first on पुढारी.