धुळे: 25 मार्चपूर्वी नुकसान भरपाईची घोषणा होणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मात्र राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार या संकटाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात दिले. त्यामुळे राज्यात येत्या दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे केले जातील. त्याचप्रमाणे 25 मार्चच्या पूर्वीच अधिवेशनात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळ्यात दिली आहे.

धुळे तालुक्यातील आनंदखेडे परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे व सतीश महाले यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्याचे अधिवेशन 25 मार्च रोजी संपणार असून त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकसान भरपाई ची घोषणा करतील, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. प्राथमिक अवस्थेत राज्यात एक लाख 39 हजार हेक्टर जमिनीवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतर नुकसान भरपाईच्या क्षेत्राची कल्पना येणार आहे .या सहा महिन्यात राज्यात चार वेळेस अवकाळीमुळे शेतकरी संकटात आले असून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची वेळ आली आहे. आपण 42 वर्षापासून राजकारणात आहोत. मात्र सहा महिन्यात चार वेळेस नुकसान भरपाई देण्याची ही प्रथमच वेळ आहे. राज्यनिर्मितीपासून अशी वेळ कधीही आली नसल्याचा दावा यावेळी मंत्री सत्तार यांनी केला सरकारने 12000 कोटी रुपये मदत दिली असून अजून 28 हजार कोटी रुपये पेंडिंग आहे. आता नुकत्याच झालेल्या नुकसान भरपाई चा अंदाज आल्यानंतर आणखी मदतीची घोषणा केली जाणार आहे. राज्यात कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे पंचनामे लांबले असले तरीही राज्यातील कोणताही शेतकरी हा पंचनामामुळे नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही, याची काळजी सरकार घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा करीत आहोत. यावेळी कर्ज वसुलीच्या मुद्द्यापासून वीज वितरण कंपनीच्या काही समस्या मांडल्या गेल्या. या सर्व समस्यांवर आपण मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणात चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अन्याय होत असेल तर त्याची दखल घेतली जाईल. आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्यात 50 रोहीञ स्पेअर ठेवण्याची योजना आखली होती. रोहित्र जळाल्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र बसवून देण्याचा संकल्प आपण केला. त्यावर अंमलबजावणी देखील केली. पण आता अधिकाऱ्यांकडून चूक होऊन शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असेल ,तर कारवाई केली जाईल. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा प्रश्न मांडणार असून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

The post धुळे: 25 मार्चपूर्वी नुकसान भरपाईची घोषणा होणार - कृषिमंत्री अब्दुल सत्तार appeared first on पुढारी.