धुळे : Dhule Crime : गुदद्वारात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू; एकास अटक, सुजलॉन कंपनीतील घटना

धुळे; पुढारी वृत्तसेवा : सुजलॉन कंपनीत काम करणाऱ्या तरुण मजुराच्या गुदद्वारात प्रेशर मशीनने हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील छडवेल येथे ही घटना घडली. या घटनेतील आरोपी मजुरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मयत तरुणाच्या नातेवाईकांनी कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. (Dhule Crime)

सुजलॉन ही कंपनी पवन ऊर्जा निर्मिती करणाचे काम करते. साक्री तालुक्यातील छडवेल गावात राहणारे तुषार निकुंभ आणि हर्षल जाधव हे दोघे तरुण या कंपनीत काम करत होते. दुपारच्या जेवणानंतर हर्षलने तुषारच्या अंगावरील घाण हवेच्या प्रेशरने साफ करण्याचे नाटक करत त्याच्या गुदद्वारामध्ये हवा भरली. या घटनेत तुषार निकुंभ या तरुणाचा मृत्यू झाला. या पवन ऊर्जा निर्मितीच्या मशीनमध्ये साचलेली धूळ साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाच्या सहाय्याने हर्षलने हे कृत्य केले. (Dhule Crime)

आतड्याला मोठी इजा झाल्याने पीडित तरुणाला त्रास होऊ लागला. परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्याला सुरत येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे छडवेल गावात तीव्र पडसाद उमटले. तुषार निकुंभ याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

कंपनीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही

निजामपूर पोलीस ठाण्यात या घटनेतील हर्षल जाधव याच्या विरोधात भादंवि कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या सर्व घटनेस कंपनीचे व्यवस्थापन देखील जबाबदार आहेत. असा आरोप करत मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. तसेच कंपनीच्या व्यवस्थापनावर देखील कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत. ही कारवाई होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलक नातेवाईकांची अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महिराळे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत यावर तोडगा निघालेला नाही.

हेही वाचा

The post धुळे : Dhule Crime : गुदद्वारात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू; एकास अटक, सुजलॉन कंपनीतील घटना appeared first on पुढारी.